कांग्रेस गटनेत्याची पक्षातून हकालपट्टी करा संतोष लहामगे यांचा आक्रमक पवित्रा

March 05, 2026 by Prakash Hande

Congress Party Discipline : चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत गटनेत्याकडूनच पक्षशिस्तीचा जाहीर लिलाव होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थायी समितीच्या ७ जागांच्या निवडीबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः गटनेते राजेश अडूर यांना भ्रमणध्वनीवरून स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तसेच खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून शहर जिल्हाध्यक्षांमार्फत अधिकृत नावेही कळविली होती. मात्र, प्रदेशाध्यक्षांच्या थेट आदेशांना धाब्यावर बसवून राजेश अडूर यांनी स्वतःच्या मर्जीतील नावे देत पक्ष नेतृत्वाला उघड आव्हान दिले आहे. हा प्रकार केवळ पदाचा गैरवापर नसून प्रदेश नेतृत्वाच्या अधिकारावर केलेले थेट आक्रमण असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे यांनी म्हटले आहे. (स्थायी समिती सदस्य निवडीवरून कांग्रेस पक्षात राडा)

 

 

यापूर्वी देखील चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर बसवण्याच्या उंबरठ्यावर असताना, अशाच प्रकारच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाच्या हातून सत्ता निसटली होती. इतिहासाची पुनरावृत्ती करत आता पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षांच्या स्पष्ट आणि तोंडी सूचना असतानाही, त्यांना तिलांजली देण्याचे निंदनीय काम गटनेत्याने केले आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षहित आणि नेत्यांचा शब्द धोक्यात घालणाऱ्या अशा प्रवृत्तींमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. गटनेत्याची ही कृती म्हणजे ऐनवेळी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखीच असल्याची घणाघाती टीका लहामगे यांनी केली.

 

राजेश अडूर यांनी निष्ठावंत नगरसेवकांना जाणीवपूर्वक डावलून पक्षात मोठी फूट पाडण्याचे आणि कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे कारस्थान रचले आहे. ज्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पक्षासाठी रक्त आटवले, त्यांना बाजूला सारून केवळ स्वतःच्या फायद्यासाठी मनमानी कारभार करणे हे लोकशाही आणि काँग्रेसच्या गौरवशाली पक्ष संस्कृतीच्या पूर्णतः विरोधात आहे. अशा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या व्यक्तीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याचे मनोबल खचत असून, "पक्षात वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला काही किंमत उरली आहे की नाही?" असा संतप्त सवाल आता चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. Congress Factionalism

 

त्यामुळे, पक्षशिस्त अबाधित राखण्यासाठी आणि काँग्रेसच्या प्रामाणिक नगरसेवकांचा सन्मान करण्यासाठी राजेश अडूर यांची गटनेते पदावरून व पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे. प्रदेशाध्यक्षांनी स्वतः फोन करून सूचना दिल्यानंतरही असा उद्दामपणा करणाऱ्यांवर जर कठोर कारवाई झाली नाही, तर भविष्यात पक्षाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल. प्रदेश नेतृत्वाने या गंभीर प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांवर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई करावी आणि निष्ठावंत नगरसेवकांना न्याय द्यावा, अशी मागणी संतोष लहामगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Comment

+