crime news today : चंद्रपूर - कोरपना तालुक्यातील तुकडोजी नगर येथे मंगळवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. तपासादरम्यान, ही हत्या जुन्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्पर कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.
मृत व्यक्तीची ओळख विश्वास नरेंद्र मालेकर (वय २४, रा. तुळशी) अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादामुळे झालेल्या भांडणामध्ये आरोपीने विश्वास मालेकर यांना मारहाण केली आणि जोरदार धक्का दिला. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी काही तासांतच सुनील पवार (वय २३, रा. पारधीगुडा) या आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम १०३ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन, साईनाथ जायभाये, प्रभाकर जाधव आणि कोरपना पोलिस पथक करत आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे.
Leave a Comment