कामगारांच्या जीवाशी खेळ? दालमिया सिमेंट अपघातावरून सुधीर मुनगंटीवार संतापले; विधानसभेत मांडली लक्षवेधी

March 05, 2026 by Prakash Hande

Worker Compensation Rights : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीमध्ये सल्फ्युरिक अ‍ॅसिड टँकर लोडिंगदरम्यान झालेल्या अपघातात अक्षय कन्नाके आणि स्वाती उईके हे दोन कामगार जखमी झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत जखमी कामगारांना किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या कामगार अपघातांबाबत सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे भूमिका मांडली. (कांग्रेस गटनेत्याची हकालपट्टी करा - संतोष लहामगे)



लक्षवेधी मांडताना आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, दालमिया सिमेंट कंपनीमध्ये झालेल्या अ‍ॅसिड अपघातात जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराची जबाबदारी कंपनीने घ्यावी आणि त्यांना किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी सुमारे २५ कामगारांचा अपघाती मृत्यू होतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे,असे नमूद केले.



आ. मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की, कामगारांच्या अपघातांबाबत अनेकदा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही. अनेक घटनांमध्ये आजपर्यंत कोणालाही शिक्षा झाल्याचे दिसून येत नाही. न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे अशा प्रकरणांना न्याय मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी विद्यमान कामगार कायद्यांचा सखोल अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे.यासाठी आमदारांची एक समिती स्थापन करून या विषयाचा सर्वंकष अभ्यास करावा, अशी मागणी त्यांनी केली.  Sudhir Mungantiwar News



 दालमिया सिमेंटमध्ये जखमी झालेल्या कामगारांची विचारपूस करण्यासाठी कंपनीचे अधिकारी रुग्णालयातही गेले नसल्याची बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या कामगार अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व स्थानिक आमदारांची संयुक्त समिती स्थापन करावी आणि या संदर्भात शासनाने तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणीही आ.मुनगंटीवार यांनी केली.



यावर उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की,  दालमिया सिमेंट लिमिटेडमध्ये सल्फ्युरिक अ‍ॅसिड टँकर लोडिंग प्रक्रियेदरम्यान झालेल्या अपघातात अक्षय कन्नाके व स्वाती उईके हे कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर जखमी कामगारांना कंपनीकडून जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश देण्यात येतील, असे मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले. तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी आमदारांचा अभ्यासगट स्थापन करण्याचे आणि चंद्रपूरमध्ये अधिवेशनानंतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

Leave a Comment

+