District Collector Gondpipri : चंद्रपूर : नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ सोडवणूक व्हावी, या उद्देशाने गोंडपिपरी येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय प्रशासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक तसेच जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या आलेल्या समस्यांची यंत्रणेने तात्काळ दखल घेऊन त्यावर योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी सर्व यंत्रणांना दिले. (बल्लारपूर शहरात जिल्हाधिकारी गौडा यांचा जनता दरबार)
बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, तहसीलदार शुभम बाहेकर, गटविकास अधिकारी संजय पुप्पलवार यांच्यासह आरोग्य अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, स्थानिक स्तरावरील तक्रारी लोकशाही दिनातच सोडविणे अपेक्षित आहे. त्यामुळे लोकशाही दिनाबाबत सर्वांना अवगत करावे. घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप त्वरित करा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मंडळनिहाय घेऊन पात्र लाभार्थ्यांना त्यात विविध दाखले वाटप करावे. वाद असलेल्या अतिक्रमित रस्त्यांचे सिमांकन प्राधान्याने करून घ्यावे. पाणंद रस्त्यांच्या याद्या तयार करून ग्रामसेवक, तलाठी आणि सर्वेअर यांनी मौका पाहणी करावी. जलयुक्त शिवारची कामे त्वरित पूर्ण करा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावांवर लक्ष केंद्रित करून सर्व उद्दिष्टांची पूर्तता करावी. घरकुल अपूर्ण असल्यास संबंधित लाभार्थ्यांची बैठक घेऊन त्यांना त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्या तसेच सर्व घरकुल योजनांचा आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. District Collector Gondpipri
जनता दरबारात तालुक्यातील नागरिकांनी विविध समस्या, तक्रारी व सूचना मांडल्या. प्राप्त तक्रारींची तत्काळ नोंद घेऊन संबंधित विभागांना वेळबद्ध कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. नागरिकांशी थेट संवाद साधत जिल्हाधिका-यांनी त्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने ऐकूण घेतल्या. तसेच सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून नागरिकांना पारदर्शक व तातडीची सेवा देण्याचे आवाहन केले.
नागरिकांनी दिली निवेदने : जनता दरबारात नागरिकांनी आपापल्या समस्यांची निवेदने जिल्हाधिका-यांना देऊन त्यांना समस्या सांगितल्या. यात तालुक्यातील पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, महसूल प्रकरणे, शासकीय योजना लाभ, जमीन फेरफार नोंद, आरोग्य सुविधा, शिक्षण व इतर स्थानिक समस्यांचा समावेश होता.
Leave a Comment