Fake Death Certificate Scam : चंद्रपूर (पडोली) : पडोली ग्रामपंचायतीत प्रशासकीय यंत्रणेतील संगनमत आणि फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिवंत असलेल्या सौ. सुगंधा बाई वसंत मडामे यांना मृत घोषित करून त्यांचा बनावट मृत्यू दाखला तयार करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी एनएसयूआयचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शफाक शेख यांनी पडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. (आमदार जोरगेवार यांना आव्हान, पुरावे द्या अन्यथा माफी मागा)
तक्रारीनुसार, हा प्रकार केवळ प्रशासकीय हलगर्जीपणाचा नसून जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित बनावट मृत्यू दाखल्याच्या आधारे महिलेचे बँक खातेही बंद करण्यात आले. सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय असा प्रकार घडू शकत नाही, असा आरोप एनएसयूआयकडून करण्यात आला आहे.
गट विकास अधिकारी (BDO) यांनी सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या मृत्यू नोंदवहीत संबंधित महिलेच्या मृत्यूची कोणतीही नोंद आढळली नाही. तसेच ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांनी ऑफलाईन दाखल्यावर स्वाक्षरी केल्याचे नाकारले आहे. मात्र सादर करण्यात आलेल्या मृत्यू दाखल्यावर स्वाक्षरी व शिक्का असल्याचे दिसून येत आहे. Fake Death Certificate Scam
चौकशीदरम्यान एका कर्मचाऱ्याने नाव साधर्म्यामुळे मानवी चूक झाल्याचे सांगितले असले, तरी या स्पष्टीकरणामुळे संशय अधिकच गडद झाला आहे.
शफाक शेख यांनी संबंधितांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 471, 166, 120-ब/34 तसेच बीएनएस 2023 मधील लागू तरतुदींनुसार तात्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
मृत्यू दाखल्यावरील स्वाक्षरी आणि शिक्क्यांची फॉरेन्सिक तपासणी
ऑनलाईन पोर्टलचे लॉग, युजर आयडी व IP तपशीलांचे डिजिटल ऑडिट
दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन व अटक
दरम्यान, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एनएसयूआयकडून देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली असून, संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Leave a Comment