Illegal Tree Cutting । सरपंच, उपसरपंच अन् ग्रामसेवक अडचणीत! अवैध वृक्षतोडीप्रकरणी गावकऱ्यांचा संताप

April 06, 2026 by Prakash Hande

Illegal Tree Cutting : चंद्रपूर - जिल्ह्यातील मुल तालुक्यातील बोंडाळा खुर्द येथे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून अवैध वृक्षतोड केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. गावातील अंगणवाडी व भिंत (कंपाऊंड) बांधकामासाठी एका शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतातील तसेच रस्त्यालगत असलेल्या झाडांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. (पाणीपुरी खाल्ल्याने ५० जणांना विषबाधा)

 

सदर झाडे नोमाजी कवडू बांगरे व काशिनाथ झाडे यांच्या कडून तोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामसेवक यांनी वन विभागाची कोणतीही कायदेशीर परवानगी घेतलेली नाही, तसेच संबंधित शेतकऱ्यालाही कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही.

याबाबत पीडित शेतकऱ्याने पोंभुर्णा येथील वन विभाग कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली असून, तक्रार नोंदवून पंधरा दिवस उलटूनही ठोस कारवाई झालेली नसल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

दरम्यान, काही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ज्या जागेवर अंगणवाडी व कंपाऊंडचे बांधकाम सुरू आहे ती जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची नसून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

 

सदर प्रकरणात सरपंच सोनलताई नंदाजी बांगरे, उपसरपंच जगदीश बांगरे आणि ग्रामसेवक मोहिनी भानारकर यांच्यावर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच, ग्रामपंचायतीच्या चुकीच्या निर्णयामुळे संबंधित शेतकऱ्याच्या शेतासमोरील रस्ता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे त्यांच्यात चिंता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना पदावरून बरखास्त करण्यात यावे, तसेच अवैध वृक्षतोडीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment

+