Jharpat River Beautification : चंद्रपूर: चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या आणि आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसरातून वाहणाऱ्या झरपट नदीचे सौंदर्यीकरण नागपूरच्या फुटाळा तलावाच्या धर्तीवर करण्यात यावे, अशी आग्रही मागणी चंद्रपूर शहराच्या प्रथम महापौर तथा नगरसेविका संगीता गोपाल अमृतकर यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या संदर्भात त्यांनी खासदारांना केंद्राच्या पर्यावरण निधीतून हा प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती केली आहे. (मला व्हिलन ठरविलं, वेळ आल्यावर सत्य बाहेर येईल - खासदार धानोरकर)
माता महाकाली मंदिराच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक चंद्रपुरात येत असतात आणि श्रद्धेपोटी अनेक भाविक या नदीमध्ये स्नान करतात. या धार्मिक महत्त्वाचा विचार करून, नदी परिसराची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण निधीचा वापर करून जर या नदीकाठाचा विकास केला, तर केवळ धार्मिकच नव्हे तर शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यासही मोठी मदत होईल, असे अमृतकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे चंद्रपूरकर नागरिकांना फिरण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी एक उत्तम निसर्गरम्य ठिकाण उपलब्ध होईल, जे त्यांच्या आरोग्य आणि मनोरंजनाच्या दृष्टीने हिताचे ठरेल. चंद्रपूर शहराच्या प्रथम महापौर तथा महाकाली प्रभागाच्या नगरसेविका संगीता अमृतकर यांनी खासदारांना विनंती केली आहे की, त्यांनी स्वतः महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि तातडीने सविस्तर प्रस्ताव तयार करून या कामाला गती द्यावी, जेणेकरून शहराच्या वैभवात मोलाची भर पडेल.
Leave a Comment