journalist ramesh nishad threat : राजुरा : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा राजुरा यांच्या वतीने वरिष्ठ पत्रकार रमेश निषाद यांना दिलेल्या शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांना ‘चौथा स्तंभ’ मानले जाते. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडून जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असताना त्यांच्यावर होणारे हल्ले व धमक्या ही गंभीर बाब असल्याचे संघाने निवेदनात नमूद केले आहे. (बाहेर निघा, जोरगेवार समर्थक नगरसेवकांना दाखविला बाहेरचा रस्ता)
संघाच्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी बल्लारपूर येथे वरिष्ठ पत्रकार रमेश निषाद यांना रस्त्यात अडवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित प्रकाराची तक्रार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी तसेच चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. मात्र अद्यापही प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली नाही.
पत्रकारांवर वाढत्या धमक्या, मारहाण व दबाव टाकण्याच्या घटनांमुळे लोकशाहीच्या मूल्यांना धक्का बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. समाजातील अवैध धंदे, भ्रष्टाचार व गैरप्रकार उघडकीस आणणाऱ्या पत्रकारांना संरक्षण देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून अशा प्रवृत्तीवर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी संघाने केली आहे.
राजुरा शाखेच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा पत्रकार संघटनेतर्फे पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Leave a Comment