Lohardongri Mine Protest : चंद्रपूर: जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणाऱ्या 'लोहारडोंगरी' खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने आज तिसऱ्या दिवशी प्रवेश केला. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती जागृत करण्यासाठी आज आंदोलनस्थळी 'सदबुद्धी महायज्ञ' करण्यात आला. (तांत्रिक समितीचा अहवाल अंमलात आणा - बंडू धोतरे)
मुख्य मागणी: लोहारडोंगरी खाण प्रकल्प रद्द करा बंडू धोतरे यांनी प्रामुख्याने १६ मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. यामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडोर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ही खाण सुरू झाली, तर वन्यजीवांचा मार्ग खुंटून मानव-वन्यजीव संघर्ष अधिक भीषण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आंदोलनाचे मुख्य मुद्दे आणि मागण्या:
* वन्यजीव कॉरिडोरचे संरक्षण: व्याघ्र भ्रमंती मार्ग (Corridor) सुरक्षित करून वन्यजीवांच्या अधिवासात होणारा मानवी हस्तक्षेप थांबवणे.
* मानव-वन्यजीव संघर्ष निवारण: जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू रोखण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे.
* प्रलंबित मागण्यांची पूर्तता: वन्यजीव संरक्षण आणि स्थानिकांच्या सुरक्षेबाबतच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ अंमलबजावणी करणे.
'सदबुद्धी महायज्ञ' द्वारे निषेध
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली न गेल्याने, आज आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. "प्रशासनाला आणि सरकारला या गंभीर प्रश्नावर निर्णय घेण्याची सदबुद्धी मिळावी," या उद्देशाने महायज्ञ करण्यात आला. यावेळी वन्यजीव प्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बंडू धोतरे यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला.
“चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष शिगेला पोचला आहे, सरकारने लक्ष न दिल्यास हा संघर्ष आणखीनच वाढेल. आधी दरवर्षी चार-पाच लोक मरायचे वाघांचे हल्ल्यात, आता हा आकडा 50 च्या आसपास जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाला काहीतरी सदबुद्धी घ्यावी, म्हणून आज बंडू धोत्रे यांच्या उपोषणाच्या मंडपापुढे आम्ही आज सद्बुद्धी महायज्ञ केला आहे.”
डॉ. योगेश दुधपचारे
"लोहारडोंगरी खाण प्रकल्प हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून तो चंद्रपूरकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. जोपर्यंत या विनाशकारी प्रकल्पाची परवानगी रद्द होत नाही आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत हा अन्नत्याग सत्याग्रह सुरूच राहील."
— बंडू धोतरे, अध्यक्ष, इको-प्रो. Bandu Dhotre
आज मंडपास भेट देऊन समर्थन/पाठिंबा देणारे संस्था
1. राधाकृष्ण योग महिला संस्था, तुकुम
2. वन संपदा पर्यावरण संस्था, चंद्रपूर
3. महाराष्ट्र वन सेवानिवृत्त पेन्शनर असो. नागपूर शाखा चंद्रपूर
4. स्वाब नेचर केअर संस्था,
5. स्वप्नझेप करियर अकॅडमी, तळोधी
6. पर्यावरण संवर्धन समिती, चंद्रपूर
7. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था
8. संभाजी ब्रिगेड, शाखा चंद्रपूर
9. फॉरेस्टर्स आणि फॉरेस्ट गार्ड असो. ठाणे, शाखा चंद्रपूर
Leave a Comment