बंडू धोतरे यांचे उपोषण मागे

March 14, 2026 by Prakash Hande

Lohardongri Project : चंद्रपूर - वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरण्याची शक्यता असलेल्या लोहारडोंगरी लोहखनिज प्रकल्पाच्या विरोधात ईको-प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उइके आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी शासन पातळीवर या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याचे सांगत संबंधित मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईलअशी ग्वाही देण्यात आली. त्यानंतर बंडू धोतरे यांनी आपले उपोषण आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचीही उपस्थिती होती. (चंद्रपूरला वाघाचा जिल्हा घोषित करा)

दरम्यानराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी लोहारडोंगरी लोहखनिज खान प्रकल्प रद्द करण्यात यावाअशी ठाम मागणी केली. चंद्रपूर जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पामुळे जंगल क्षेत्रावर परिणाम होण्याची तसेच वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सभागृहात मांडले. स्थानिक नागरिकांच्या भावना आणि पर्यावरणीय बाबींचा विचार करून शासनाने योग्य निर्णय घ्यावाअसेही त्यांनी सभागृहात सांगितले होते.

 

आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, लोहारडोंगरी येथे सुमारे ३५ ते ३६ हेक्टर क्षेत्रात खान प्रकल्प प्रस्तावित आहे. हा परिसर ताडोबा आणि घोडाझरी दरम्यान वाघांसाठी अत्यंत महत्त्वाचा कॉरिडॉर मानला जातो. अशा ठिकाणी उत्खननाला परवानगी दिल्यास वाघांचा अधिवास बाधित होऊन वाघ-मानव संघर्ष वाढण्याची शक्यता आहेअशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षांत वाघ-मानव संघर्षात २०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची बाबही त्यांनी सभागृहात मांडली. त्यामुळे पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचा विचार करून हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती.

 

यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले होते कीसदर खान प्रकल्पाला अद्याप कोणतीही अंतिम परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच हे प्रकरण सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असून या प्रकल्पाला मंजुरी देण्याचा शासनाचा कोणताही मानस नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

दरम्यानआज आंदोलनकर्ते बंडू धोतरे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाची भूमिका त्यांना समजावून सांगण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली होती. त्या चर्चेची माहितीही बंडू धोत्रे यांना देण्यात आली. त्यानंतर बंडू धोत्रे यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

Leave a Comment

+