Maharashtra Bus Theft । मेहुणीच्या मुलीचं बारसं आटोपलं अन्...; परतीच्या प्रवासात ६ लाखांचा ऐवज चोरीला!

April 02, 2026 by Prakash Hande

Maharashtra Bus Theft : राजुरा - मेहुणीच्या मुलीच्या नामकरण कार्य्रक्रमाला गेल्या आणि ६ लाखांचे सोनं व रोख रक्कम गमावून बसल्या, १ एप्रिल रोजी हा प्रकार राजुरा ते नागपूर या बसमध्ये घडला. याबाबत राजुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. (बल्लारपूर वरोरा बस प्रवासादरम्यान महिलेचे १ लाखांचे दागिने चोरीला)

 

४२ वर्षीय स्मिता सुनील मत्ते राहणार भद्रावती ह्या ३१ मार्चला आपल्या माहेरी मौजा पंचाळा मध्ये मेहुणीच्या मुलीच्या नामकरण कार्यक्रमात आपल्या मुलासह आल्या होत्या, कार्यक्रम आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी १ एप्रिल ला स्मिता आपल्या गावी जाण्यास निघाल्या.

 

दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या भावाने राजुरा बस स्थानकावर सोडले, काही वेळाने राजुरा ते नागपूर या बसमध्ये भद्रावती येथे जाण्याकरिता त्या बसल्या, त्यावेळी स्मिता मत्ते यांच्या खांद्यावर लेडीज बॅग होती व हातात सामानाची थैली, बस चंद्रपूरला पोहोचल्यावर त्यांनी बॅग कडे बघितले असता त्याची चैन उघडी होती, बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये लहान बॅग दिसली नाही.

 

लहान बागेत सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवली होती, बॅग मध्ये सोन्याची कंठी, शॉट कंठी, ३ अंगठी, सोन्याचा गोप, सोन्याची चैन, कानातले दागिने व नगदी ३० हजार रुपये असा एकूण ६ लाख रुपयांचा ऐवज अज्ञाताने लांबविला. याबाबत स्मिता मत्ते यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध राजुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी कलम ३०३ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

Leave a Comment

+