Manikgarh Cement Pollution : चंद्रपूर : गडचांदूर शहरातील वाढते प्रदूषण व आरोग्याचा प्रश्न तारांकित प्रश्नाद्वारे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा गंभीर आरोप केला. संबंधित माणिकगड सिमेंट कंपनीवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. (चंद्रपुरात काळया धुळीचे साम्राज्य, भाजपने दिला आंदोलनाचा इशारा)
आमदार अडबाले यांनी मांडलेल्या प्रश्नात गडचांदुर शहरालगत असलेल्या माणिकगड सिमेंट उद्योगात इंधन म्हणून घनकचऱ्याचा वापर केला जातो. या कचऱ्याचे साठवण डम्पिंग यार्ड शहराच्या अगदी जवळ करण्यात येत असून, तेथून येणारी दुर्गंधी व ज्वलनावेळी निर्माण होणारा धूर सुमारे एक किलोमीटर परिसरात पसरतो. परिणामी घरांमध्ये धूळ साचणे, वाहनांवर प्रदूषणाचा थर बसणे तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.
त्यांनी पुढे विचारले की, शहरालगत असलेले डम्पिंग यार्ड अन्यत्र हलविण्याबाबत निर्णय घेतला जाणार का? नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार का? प्रदूषणास जबाबदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार का?
या प्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, प्राप्त तक्रारीनंतर प्रशासनाने यापूर्वीही संबंधित उद्योगाला नोटिसा बजावल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये कारणे दाखवा नोटीस देऊन सुमारे ५० लाखांची बँक हमी जप्त करण्यात आली होती. त्यानंतर २०२४–२५ दरम्यानही पुन्हा उल्लंघन आढळल्याने १५ लाखांची हमी जप्त करण्यात आली आहे.
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासणी व हवा गुणवत्ता परीक्षण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पुन्हा तक्रार असल्यास तातडीने अधिकाऱ्यांना पाठवून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. डम्पिंग यार्ड स्थलांतराबाबतचा निर्णय हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असल्याचे स्पष्ट करत, उद्योगाने घनकचरा साठवणूक मधून इंधन म्हणून वापरणे बंद करण्याबाबत लेखी कळविल्याचेही त्यांनी सभागृहात उत्तरात नमूद केले. आरोग्यविषयक परिणामांबाबत आवश्यक ती माहिती आरोग्य विभागामार्फत घेऊन उपाययोजना करता येतील, असेही त्या म्हणाल्या. Gadchandur Air Pollution
दरम्यान, प्रदूषण नियंत्रणासाठी संबंधित यंत्रणेमार्फत सातत्याने कारवाई व देखरेख सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. सभागृहात हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला असून गडचांदूरमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माणिकगड सिमेंट कंपनी प्रदूषण व आरोग्याच्या संबंधित समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढेपर्यंत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.
Leave a Comment