चंद्रपूर-गडचिरोलीतील 12,983 कार्यालये झाली ‘स्मार्ट’

January 28, 2026 by Prakash Hande

MSEDCL smart meter : चंद्रपूर, दि. 28 जानेवारी 2026: राज्यातील ऊर्जा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अधिक सक्षम बनवण्यासाठी महावितरणने टाकलेले पाऊल आता यशस्वी होताना दिसत आहे. स्मार्ट वीज मीटरबाबत समाजात पसरलेले विविध गैरसमज आणि शंका दूर करत महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाने एक नवा टप्पा गाठला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 12 हजार 983 शासकीय कार्यालयांनी आता 'स्मार्ट' कात टाकली असून, या बदलामुळे केवळ अचूक वीजबिलच नव्हे, तर वीज बचतीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. (राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू)
 
            गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनात मीटर रीडिंग न होणे, रीडिंगमध्ये होणाऱ्या मानवी चुका किंवा सरासरी वीजबिल (Average Bill) मिळणे यांबाबत तक्रारी असायच्या. मात्र, आता बसवण्यात आलेले 'स्मार्ट मीटर' पूर्णतः स्वयंचलित आहेत. यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरज नसल्याने 'मानवी चूक' होण्याची शक्यताच उरलेली नाही. चंद्रपूर परिमंडळातील 12 हजार 983 शासकीय कार्यालयांमध्ये हे मीटर बसवल्यानंतर तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले असल्याचे चित्र समोर आले आहे.
 
27 जानेवारी 2026 पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 6 हजार 351 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 6 हजार 632 अशा एकूण 12983 शासकीय कार्यालयांचे वीज मीटर 'स्मार्ट' करण्यात आले आहेत. या मीटरमुळे मीटर रीडिंग न होणे किंवा सरासरी वीजबिल येणे अशा जुन्या तक्रारी आता इतिहासजमा होणार आहेत.
 
स्मार्ट मीटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मीटर महावितरणच्या मोबाईल ॲपशी जोडलेले आहेत. ग्राहकांना आता दर तासाला आपण किती वीज वापरली, याची माहिती घरबसल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. कोणत्या उपकरणांमुळे वीज जास्त खर्च होत आहे, हे समजल्यामुळे ग्राहकांना आपल्या वापरावर नियंत्रण ठेवता येईल. यामुळे 'वापरानुसार बिल' ही संकल्पना प्रत्यक्षात येईल आणि वीज बचतीची  सवय लागून ग्राहकांचे आर्थिक नियोजन अधिक सोपे होणार आहे. MSEDCL smart meter
 
ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार नाही:
अनेक ग्राहकांच्या मनात या मीटरच्या खर्चाबाबत धास्ती होती. मात्र, महावितरणने हे स्पष्ट केले आहे की, हे मीटर पूर्णपणे नि:शुल्क बसवण्यात येत आहेत. ग्राहकांवर कोणताही आर्थिक भुर्दंड पडणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांसोबतच शासकीय निवासस्थाने आणि नवीन वीज जोडणी घेणाऱ्या ग्राहकांनाही स्मार्ट मीटरच दिले जात आहेत. विशेषतः 'सोलर नेट मीटरिंग' करणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर वरदान ठरत असून सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे.
 
सध्या चंद्रपूर परिमंडळात टप्प्याटप्प्याने हे काम सुरू असून सुरुवातीला शासकीय कार्यालये, महावितरणची स्वतःची कार्यालये, शासकीय निवासस्थाने आणि मोबाईल टॉवर्सना प्राधान्य दिले जात आहे. तसेच नवीन वीज जोडणी घेणाऱ्या ग्राहकांनाही स्मार्ट मीटरच दिले जात असून 'सोलर नेट मीटरिंग'साठी देखील याचा मोठा उपयोग होत आहे. शासकीय कार्यालयांसोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील 367आणि गडचिरोली जिल्ह्यातील 713 अशा एकूण 1 हजार 80 मोबाईल टॉवर्सला स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.
 
विश्वासाचे नाते आणि आधुनिकतेची कास
"नवे अद्ययावत तंत्रज्ञान हे ग्राहकांच्या सोयीसाठीच आहे. स्मार्ट मीटर हे पूर्णतः प्रमाणित असून ते तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम आहेत. यामुळे महावितरण आणि ग्राहक यांच्यातील पारदर्शकता वाढणार आहे," असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे. ग्राहकांच्या मनात काहीही शंका असल्यास त्या दूर करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सदैव तत्पर असून, नागरिकांनी या आधुनिक बदलाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave a Comment

+