Panipuri । बापरे! पाणीपुरी खाणं बेतलं जीवावर; चंद्रपुरात ५० जणांना भीषण विषबाधा.

April 06, 2026 by Prakash Hande

Panipuri Food Poisoning : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात अंतरगाव येथे पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल ५० नागरिकांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २ एप्रिल रोजी उघड झाली. १ एप्रिलच्या सायंकाळी गावातील अनेकांनी हातगाडीवरून पाणीपुरी खाल्ली होती. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच लहान मुलांसह अनेकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. (डॉ मुंधडा यांच्या रुग्णालयात चोरी)

 

प्रकृती बिघडल्यामुळे सर्व रुग्णांनी अंतरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी यांनी तातडीने गावातच मुक्काम करत अतिरिक्त वैद्यकीय पथक बोलावले. ग्रामपंचायत शाळेत विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आणि दोन दिवस वैद्यकीय कर्मचारी गावात तैनात होते.

 

एकूण ५० रुग्णांपैकी ४० जणांना ओआरएस पावडर व औषधे देऊन घरी सोडण्यात आले, तर १० जणांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना सलाईन लावण्यात आले. सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. खबरदारी म्हणून दोन रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

 

दरम्यान, ज्या हातगाडीवरून पाणीपुरी विक्री केली जात होती, त्या विक्रेत्यावर ग्रामपंचायतीने कारवाई करत नोटीस बजावली आहे. अन्न व औषध प्रशासनाने घटनास्थळावरून पाणी व खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्राथमिक तपासात अस्वच्छता आणि दूषित पाण्यामुळे ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

याबाबत बोलताना डॉ. रवींद्र चौधरी यांनी सांगितले की, माहिती मिळताच तातडीने आरोग्य शिबिर उभारून उपचार सुरू करण्यात आले. सध्या सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. उन्हाळ्यात उघड्यावर मिळणारे पदार्थ खाताना नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी आणि दूषित पाण्यापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Comment

+