PMAY चा हप्ता कधी मिळणार? चंद्रपूरच्या खासदारांनी थेट दिल्लीत लावून धरला विषय

March 12, 2026 by Prakash Hande

PMAY Subsidy : चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मध्यमवर्गीय (MIG) गृहकर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणारी ₹ २.५० लाखांची प्रलंबित 'क्रेडिट लिंक्ड सबसिडी' तात्काळ वितरित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय आवासन आणि शहरी कार्य केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांना सविस्तर पत्र पाठवून, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांना भेडसावणाऱ्या या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. (चंद्रपूर महानगरातील विविध प्रभागात आयुक्तांची भेट)

 

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले की, सन २०१७ ते २०२१ या कालावधीत बँकांकडून गृहकर्ज घेणाऱ्या अनेक पात्र लाभार्थ्यांना अद्याप योजनेनुसार अपेक्षित असलेली सबसिडी प्राप्त झालेली नाही. 'ग्राहक पंचायत महाराष्ट्र' या संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, अनेक वर्षे उलटूनही ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने सर्वसामान्य कर्जदारांवर ₹ २.५० लाखांच्या अतिरिक्त मुद्दलाचा आणि त्यावर वाढत असलेल्या व्याजाचा मोठा आर्थिक भार पडत आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडले असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

 

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, ज्या पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव किंवा निधीअभावी प्रलंबित आहेत, त्यांना सबसिडीची रक्कम तात्काळ वितरित करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत, तसेच केंद्र सरकारने यावर तातडीने कार्यवाही करून सामान्य कुटुंबांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. 

Leave a Comment

+