काळजाचा थरकाप! पोंभूर्ण्यात भांडी घासताना ओढवला मृत्यू; एका क्षणात होत्याचे नव्हते झाले

February 17, 2026 by Prakash Hande

Pombhurna Electric Shock Accident : पोंभूर्णा (दि. १७) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास एका महिलेचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सुफल सुनील वनकर (वय २९, रा. पोंभूर्णा) असे मृत महिलेचे नाव आहे. (शासकीय जमीन लाटण्याचा प्रयत्न, आप ने उघडकीस केला प्रकार)

 

प्राप्त माहितीनुसार, सुफल वनकर या आपल्या घरासमोरील लोखंडी शेडमध्ये भांडी धुत होत्या. संबंधित शेडजवळील विद्युत पुरवठ्याची वायर तुटलेली असल्यामुळे त्या लोखंडी शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. या धोक्याची कल्पना नसल्याने त्यांनी शेडला स्पर्श केला असता त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

घटनेच्या वेळी घरात इतर कोणीही उपस्थित नसल्याने काही काळ ही बाब लक्षात आली नाही. दरम्यान, आरडीचे पैसे घेण्यासाठी आलेल्या एजंटला प्रकार दिसून आला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना माहिती दिली.

 

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मृत सुफल वनकर यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आंबेडकर चौक परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment

+