MP Pratibha Dhanorkar : चंद्रपूर : जागतिक महिला दिनानिमित्त नवजीवन महिला मंडळ आणि श्री स्वामी समर्थ गुरुकुंज उद्यान शारदा महिला मंडळ, तुकूम यांच्या वतीने आयोजित 'आनंद मेळावा' व 'भजन स्पर्धेत' खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणायल्या की, "मी एका विशिष्ट पक्षाची लोकप्रतिनिधी असले तरी समाजातील प्रत्येक महिला माझ्यासाठी महत्त्वाची आहे. जात, धर्म किंवा पक्ष याचा विचार न करता माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक भगिनीसाठी माझे दरवाजे सदैव उघडे आहेत." महिलांनी केवळ घरगुती जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न राहता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (दुर्गापूर पोलीस ठाण्यात आता आयपीएस अधिकारी)
भाषणादरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सिंधूताई सपकाळ आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांसारख्या महान महिलांचा उल्लेख करत त्यांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. "जिजाऊंच्या लेकी म्हणून काम करताना महिलांनी एकमेकींचे पाय न ओढता एकमेकींना आधार दिला, तर समाजात अनेक नव्या महिला लोकप्रतिनिधी आणि यशस्वी उद्योजिका तयार होतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा खासदार महोदयांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तुकूम येथील सामाजिक भवन परिसरात आयोजित या सोहळ्यात महिला बचत गटांसाठी 'भव्य आनंद मेळावा' आणि भजन मंडळांसाठी 'सामूहिक देशभक्तीपर भजन स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते. स्थानिक महिला व युवतींनी लेझीम पथक, पारंपरिक नृत्य आणि गाण्यांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात स्त्रीशक्तीचा अनोखा उत्साह दिसून आला. Pratibha Dhanorkar News
या कार्यक्रमाला माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेविका सुनंदा धोबे , नगरसेविका वनश्री मेश्राम, माजी नगरसेविका छबूताई वैरागडे, दिलीप वावरे, सुवर्णा लोखंडे, प्रतिभा पेंदाम, आशिष बोन्डे यांची उपस्थिती होती. यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कीर्ती ठाकूर व शितल खंडारे यांनी केले, तर प्रास्ताविक सुवर्णा लोखंडे यांनी मांडले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नवजीवन महिला मंडळ, कुलनिर्माण, चंद्रशोभा बहुउद्देशीय संस्था आणि श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a Comment