Railway Encroachment । चंद्रपूरकरांना मोठा दिलासा! रेल्वेच्या जागेवरील घरांबाबत सुधीर मुनगंटीवारांचा 'मानवतावादी' तोडगा

April 08, 2026 by Prakash Hande

Railway Encroachment Solution : चंद्रपूर : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून रेल्वे अतिक्रमणाच्या प्रश्नावर सर्वसमावेशक व मानवतावादी तोडगा काढण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर रेल्वेलाइनलगतच्या अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन प्राधान्याने करत टप्प्याटप्प्याने नियोजनबद्ध कारवाई करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांवर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेत निश्चित कालमर्यादा ठरवूनच पुढील निर्णय घेण्याची भूमिका मांडण्यात आली. (चंद्रपूर जिल्ह्यातील भोंदूगिरीला बसणार चाप)



बैठकीस जिल्हाधिकारी वसूमना पंत, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, रेल्वे विभागाचे दिलीप शेलुकर, रवींद्र सिंग, योगेंद्रसिंग बैस, उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले की, रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरू असून अतिक्रमणधारकांसाठी टप्प्याटप्प्याने पुनर्वसनाची स्पष्ट योजना तयार करणे आवश्यक आहे. येत्या तीन ते पाच वर्षांत ९०० हून अधिक घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात यावे.



म्हाडामार्फत २००४ घरे उभारली जात असून येत्या एक ते दीड वर्षांत ती पूर्णत्वास येणार आहेत. या घरांसाठी २३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सुमारे १० लाख रुपये बांधकाम खर्च असलेल्या घरांवर साडेचार लाख रुपयांची सबसिडी देऊन लाभार्थ्यांना ३ ते ४ लाख रुपयांत घरे उपलब्ध करून देण्याचा आपला आग्रह असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.



गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या चंद्रपूर शहरातील सावरकर नगर, जलनगर, उडिया बस्ती, महाकाली कॉलरी, बगड खिडकी  नागरिकांच्या पुनर्वसनाशिवाय कोणतीही कारवाई करू नये, अशी ठाम भूमिका मांडताना प्रथम टप्प्यातील २४ घरांच्या हटवणीसंदर्भातही सर्वसमावेशक निर्णय होईपर्यंत कार्यवाही थांबविण्याची मागणी त्यांनी केली. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले. Sudhir Mungantiwar News



यापूर्वी मुंबई येथे मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांसोबत झालेल्या बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला. विशेषतः चंद्रपूर रेल्वेलाईनलगतच्या अतिक्रमणधारकांवरील कारवाई तात्पुरती स्थगित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. अतिक्रमणधारकांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी संबंधित विभागाचे संपर्क क्रमांक दर्शविणारे सूचना फलक उभारण्याचे निर्देशही आ.मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.



दरम्यान, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देत रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी सर्व बाबींचा विचार करणारा व्यवस्थित व नियोजनबद्ध आराखडा तातडीने तयार करावा, असे स्पष्ट केले. या आराखड्यात नागरिकांचे हित जपले जाईल, त्यांना कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जावी, तसेच पुनर्वसन प्रक्रिया पारदर्शक आणि टप्प्याटप्प्याने राबविण्यात यावी, अशा सूचनाही आ.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment

+