"समित्या केवळ कागदावर नकोत!" चंद्रपुरात चाकणकरांनी अधिकाऱ्यांचे टोचले कान

February 19, 2026 by Prakash Hande

Rupali Chakankar News : चंद्रपूर - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बुधवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विभागाचा आढावा घेऊन सुचना केल्या. (ब्रह्मपुरी मधील वाघ संकटात, लोह खाणीला पर्यावरणवाद्यांचा विरोध)

 

बैठकीला महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, भागवत तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, मनपा उपायुक्त संजय चिद्रावार आदी उपस्थित होते.

 

यावेळी श्रीमती चाकणकर म्हणाल्या, शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये महिलांसदर्भात असलेल्या अंतर्गत तक्रार समितीचे ऑडीट करावे. या समित्या केवळ कागदावर न राहता ॲक्टीव्ह असल्या पाहिजे. जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरला अचानकपणे भेट देऊन तपासणी करावी. अवैधरित्या चालणारे सोनोग्राफी सेंटर, गर्भपात सेंटरवर कडक कारवाई करा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांना रोजगाराची साधने उपलब्ध करून द्या.

 

प्रत्येक शासकीय कार्यालये, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे असली पाहिजे. त्याची नियमित साफसफाई करून पाण्याची व्यवस्था ठेवावी. आदिवासी विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थीनींना ने-आण करणा-या पालकांची खात्री झाल्याशिवाय इतर कोणाहीसोबत पाठवू नये. त्यांना अधिकृत ओळखपत्रे द्यावीत तसेच त्याची नियमित तपासणी करावी. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरावरील यंत्रणेला सोबत घेऊन बालविवाहाला प्रतिबंध करा. नागरिकांची लोकोपयोगी कामे वेळेत आणि जबाबदारीने करा, अशा सुचना अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या. Rupali Chakankar Chandrapur

 

विविध विभागाचे सादरीकरण : यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सादरीकरण करतांना अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती, बालविवाह प्रतिबंध, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी असलेल्या योजना आदींबाबत माहिती दिली. तसेच आरोग्य विभागांतर्गत अल्पवयीन मुलींची प्रसुती, महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र,  विशाखा समिती, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, गरोदर महिलांसाठी विशेष उपाययोजना यांच्यासह शिक्षण विभाग, कामगार कल्याण विभाग, राज्य परिवहन महामंडळ, आदिवासी विकास विभाग, चंद्रपूर महानगर पालिका आदी विषयांचे सादरीकरण करण्यात आले.

Leave a Comment

+