चंद्रपूर मनपाचा नवा बॉस कोण? स्थायी समिती सभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर!

March 10, 2026 by Prakash Hande

Standing Committee Chairman : चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाची निवड करण्यासाठी दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक महानगरपालिकेच्या गांधी चौक येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील “राणी हिराई” सभागृहात पार पडणार आहे. (चंद्रपूर मनपाच्या कारवाईत ३ पोते प्लास्टिक जप्त)



सदर बैठक जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार स्थायी समितीच्या सदस्यांमधून सभापती पदाची निवड करण्यात येणार आहे.



सभापती पदासाठी इच्छुक सदस्यांसाठी कोरे नामनिर्देशन पत्रे दि. ११ मार्च ते १२ मार्च २०२६ दरम्यान सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत महानगरपालिका सचिव यांच्या कक्षात उपलब्ध राहतील. नामनिर्देशन पत्रे दि. १३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील.

त्यानंतर दि. १६ मार्च २०२६ रोजी सभा सुरू झाल्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. वैध नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. जर एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले, तर मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल.



या बैठकीस महानगरपालिकेचे सर्व स्थायी समिती सदस्य उपस्थित राहणार असून निवडणूक प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

+