'सेव्ह ताडोबा' मोहिमेला अभूतपूर्व यश; केवळ काही दिवसांतच २०,००० स्वाक्षऱ्यांचा टप्पा पार!

February 21, 2026 by Prakash Hande

Stop Lohardongri Mine : चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-कऱ्हांडला तसेच नवेगाव-नागझिरा या अतिशय संवेदनशील व्याघ्र भ्रमणमार्गातील प्रस्तावित ‘लोहारडोंगरी’ लोहखनिज खाण रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या 'सेव्ह लोहारडोंगरी, सेव्ह ताडोबा' या ऑनलाईन मोहिमेला अभूतपूर्व यश मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत या याचिकेने २०,००० स्वाक्षऱ्यांचा आकडा पार केला असून, हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आता जनचळवळ अधिक तीव्र झाली आहे.  (चंद्रपूरच्या नटवरलाल ने १५ बेरोजगार युवकांची केली फसवणूक)

 

वाढता विरोध आणि प्रमुख कारणे:
* व्याघ्र कॉरिडोरचा विनाश: ब्रह्मपुरी वनविभाग हा भाग ६० पेक्षा जास्त वाघांचे हक्काचे घर अधिवास असून, खाणकामामुळे हा अधिवास नष्ट होईल.
* १८ हजार झाडांची कत्तल: या प्रकल्पासाठी ३५.९४ हेक्टरमधील तब्बल १८,०२४ झाडे कापली जाणार आहेत, ज्यामुळे पर्यावरणाचे न भरून निघणारे नुकसान होईल.
* मानव-वन्यजीव संघर्षात वाढ: जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २०० जणांचा बळी गेला आहे, २०२५ वर्षात ४७ ग्रामस्थांचा मृत्यू झालेला आहे. खाणीतील ब्लास्टिंग आणि जंगलतोडीमुळे वाघ मानवी वस्तीत शिरतील, ज्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरेल.
* तुटपुंजा रोजगार: १२० जणांना रोजगार मिळेल असा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात केवळ ३२ जणांनाच कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे. तेही विशेष कौशल्यप्राप्त असतील. Save Tadoba Campaign

 

तज्ज्ञांचे मत:
राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य बंडू धोतरे यांनी म्हटले आहे की, "हा प्रकल्प केवळ चंद्रपूरचा प्रश्न नसून संपूर्ण व्याघ्र संवर्धनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. कालवे, सिंचन प्रकल्प आणि रस्ते रुंदीकरणामुळे आधीच जंगलाचे तुकडे झाले असताना, या खाणीला परवानगी देणे म्हणजे निसर्गाची थट्टा आहे. निसर्गसंपन्न लोहारडोंगरी परिसराच्या सभोवताल असलेली गावे आता मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती आणि हवा-पाणी प्रदूषण निर्माण होण्याची तसेच येथील कृषी क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता आहे."

 

जागरूक नागरिकांना कळकळीचे आवाहन:
२०,००० स्वाक्षऱ्यांचा टप्पा ही तर केवळ सुरुवात आहे. हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही सर्व सुजाण नागरिकांना खालीलप्रमाणे आवाहन करत आहोत:
१. ज्यांनी अजूनही या ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षरी केली नाही, त्यांनी त्वरित आपली स्वाक्षरी नोंदवून जंगल-निसर्ग रक्षणात सहभाग घ्यावा.
२. आपल्या भागातील समस्या आणि खाणीमुळे होणाऱ्या धोक्यांबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून ही मोहीम प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावी.
३. जिल्ह्यातील प्रत्येक गावाने आणि शहराने या विनाशाविरुद्ध आपला आवाज बुलंद करावा.

 

प्रस्तावित लोहारडोंगरी खाण बाधित वनक्षेत्रास पर्यावरण-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी…
इको-प्रो तर्फे लोहारडोंगरी ठिकाणाला अनेक अभ्यासभेटी देण्यात आलेल्या आहेत, यात नागपूर स्वानंद सोनी, उदयन पाटील, अनुसया काळे, प्राची माहूरकर, श्रीकांत देशपांडे, आरजे प्रीती, पराग देशमुख, उदय दामले, अमित गिर्हे, नचिकेत तांबूलकर, स्नेहल गोस्वामी तर चंद्रपूर चे बंडू धोतरे, प्रा योगेश दुधपचारे, किशोर जामदार, Adv वर्षा जामदार, मोहम्मद शरीफ, Adv नाजीम खान, प्रा मनीष तिवारी, भाविक येरगूडे, महेंद्र राळे, विलास माथनकर, सुभाष शिंदे, भारती शिंदे, अब्दुल जावेद, कुणाल देवगीरकर, राजू काहिलकर, अभय अमृतकर, विजय हेडाऊ, सुनील लिपटे, सुमित कोहळे, सचिन धोतरे याशिवाय इको-प्रो चे अनेक सदस्यांनी वेळोवेळी आतापर्यंत भेटी दिल्या आहेत.

Leave a Comment

+