"अधिकाऱ्यांची दाणादाण! आमदार सुधाकर अडबालेंनी भर सभेतच झापले; भ्रष्टाचाराच्या चौकशीची केली मागणी

February 15, 2026 by Prakash Hande

Sudhakar Adbale MLC News : चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा “समस्या तुमच्या, पुढाकार आमचा” या उपक्रमा अंतर्गत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या यांच्या नेतृत्वाखाली इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत संचालित नागपूर विभागातील आश्रमशाळांतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा दिनांक १२/०२/२०२६ रोजी प्रादेशिक उपसंचालक, नागपूर श्री. विजय वाकुलकर यांचे कार्यालयामध्ये पार पडली. सभेकरिता विभागातील सहाही जिल्ह्याच्या सहाय्यक संचालकांना पाचारण करण्यात आले. (पोलीस भरती मध्ये सेन्सर ठरला शत्रू, मुनगंटीवार यांनी भावी पोलिसांच्या समस्येची घेतली दखल)



विभागाचा शासन निर्णय दिनांक ४ जून २०२५ नुसार विजाभज आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन २०२० पासून बंद असलेला प्रोत्साहन भत्ता प्रलंबित थकबाकी माहे फेब्रुवारीच्या वेतनात अदा करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह पात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या एकस्तर वेतननिश्चिती सादर करून पडताळणीची प्रक्रिया सुरू करून ते लाभ देण्यात यावे, शासनादेशानुसार जेष्ठतेप्रमाणे मुख्याध्यापक पदोन्नत्या करण्याबाबत आठ दिवसात पत्र निर्गमित करण्यात यावे, पात्र मुख्याध्यापक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित अर्जित रजा रोखीकरणाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावेत, डीसीपीएस धारक शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हिशोब चिठ्ठ्या तयार करून मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास निवृत्ती वेतन व इतर लाभ मंजूर करण्यात यावे, वरिष्ठ/निवड श्रेणी प्रलंबित प्रस्ताव सेवा हमी कायद्यानुसार विहित कालावधीत मंजूर करण्यात यावेत, याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.



सभेच्या सुरुवातीलाच चंद्रपूरचे सहाय्यक संचालक सचिन मडावी यांनी विमाशी संघटना प्रमुखांबाबत केलेल्या ग्रुपमधील आक्षेपार्ह पोष्टबाबत संघटना पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला व यापूर्वी २९ ऑगस्‍टला झालेल्या सभेचे इतिवृत्त न देणे, सभेतील मागण्यांकडे दुर्लक्ष करणे, शिक्षकांचे समायोजन व इतर प्रशासकीय कामकाजात अनियमितता करून शासनाची दिशाभूल करणे, भ्रष्टाचारास चालना देणे, याबाबत आमदारांनी त्यांना धारेवर धरले व या सर्व प्रकरणांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आमदारांनी प्रादेशिक उपसंचालकांना केली. Sudhakar Adbale MLC News



याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश धोटे, कोषाध्यक्ष श्री. भूषण तल्हार, वर्धा जिल्‍हा कार्यवाह महेंद्र सालंकार, नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बढे, नागपूर जिल्‍हाध्यक्ष अनिल गोतमारे, जिल्‍हा कार्यवाह संजय वारकर, विजय गोमकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्‍हा कार्यवाह दीपक धोपटे, चंद्रपूर महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, आश्रमशाळा विभागीय सचिव प्रमोद मुनेश्वर, आश्रमशाळा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी, जिल्हा कार्यवाह किशोर नगराळे, राज्यपाल बोरकर, मंसराम हेमने, अमोल डोंगे तसेच समस्याग्रस्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

+