Tractor Accident News : ब्रह्मपुरी - शेतमाल घेऊन परत येत असताना ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॉलीसह वाहन गोसेखुर्दच्या कालव्यात कोसळले. या दुर्घटनेत एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. (चंद्रपुरात श्रेयवादाची लढाई)
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोधी खुर्द येथील विश्वनाथ भिवणकर (वय ५५) यांच्या शेतातील तुरीच्या पेंढ्या आणण्यासाठी गोवर्धन मेश्राम यांच्या मालकीचा ट्रॅक्टर शेतात गेला होता. पेंढ्या ट्रॉलीमध्ये भरून मुई–तळोधी खुर्द मार्गाने परत येत असताना गोसेखुर्द कॅनलजवळ चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या नहरात उलटल्याने मोठी दुर्घटना घडली.
अपघातावेळी ट्रॅक्टर चालवणारा दीपक अलाम (वय ४०) हा दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. नियंत्रण न राहिल्याने ट्रॅक्टर थेट कालव्यात गेल्याचे सांगितले जाते. या अपघातात विश्वनाथ भिवणकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गिरीधर कन्नाके (वय ५४) जखमी झाले असून त्यांच्यावर गांगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Leave a Comment