ऊर्जानगर नेरीमध्ये मध्यरात्रीपर्यंत आगीचा थरार! मदतीची वाट न पाहता ग्रामस्थांनीच 'असा' विझवला वणवा

February 28, 2026 by Prakash Hande

Urjanagar Neri Fire : मूल (चंद्रपूर) : तालुक्यातील उर्जानगर नेरी, वार्ड क्रमांक ६ येथील गावाच्या कचरा डंपिंग पटांगणात २७ फेब्रुवारीला सायंकाळी सुमारे ६ वाजता अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. गावातील तसेच गावाबाहेरील कचरा या ठिकाणी टाकला जातो. आग लागल्यानंतर काही वेळातच तिने मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण परिसर धुराने व दुर्गंधीने व्यापला. (मजुरांच्या डोळ्यासमोर वाघाने महिलेची केली शिकार)

 

डंपिंग ग्राउंडमध्ये इ-वेस्ट, मेडिकल वेस्ट, केमिकल वेस्ट तसेच घरगुती वापरातील विविध वस्तूंचा समावेश असल्याने आगीमुळे निर्माण झालेला धूर अत्यंत घातक ठरला. परिणामी, आसपासच्या वस्तीतील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेषतः मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

 

घटनेची माहिती मिळताच गावातील युवा कार्यकर्ते चेतन चौधरीकुलदीप भागडकर यांनी तात्काळ ग्रामपंचायत सदस्यांच्या घरी धाव घेतली आणि सरपंच येरगुंगे यांना परिस्थितीची माहिती दिली. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार त्वरित शासकीय मदत उपलब्ध झाली नाही.

 

दरम्यान, ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रिंकू सिंग मेहरा यांच्या घरातील बोरिंगचा वापर करून तसेच आजूबाजूच्या घरांमधून सुमारे २०० फूट पाईप एकत्र करून पाण्याची सोय करण्यात आली. एकत्रित प्रयत्नांमुळे रात्री सुमारे ११ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले.

 

आग विझविण्यात ग्रामपंचायत सदस्य उषाताई आवळे, रिंकू सिंग मेहरा, अनुज भागडकर, चैतन्य कुमरे, साहिल चौधरी, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत रणवीर, दीपक आवळे, युवराज सिंग मेहरासंघर्ष रामटेके यांचे मोलाचे योगदान राहिले. Chandrapur Local News

 

ग्रामस्थांनी सांगितले की, यापूर्वीही याच ठिकाणी अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडल्या आहेत; मात्र ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सदर प्रकरणात संबंधित प्रशासनाने लक्ष घालून कचरा व्यवस्थापनाची योग्य यंत्रणा उभारावी, अशीही ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

Leave a Comment

+