Liquor Shop Controversy : सिंदेवाही (चंद्रपूर) - दारू दुकानाला परवानगी देण्यासाठी वासेरा मधील ग्रामसभेत गावातील महिलांना न बोलविता थेट रोजगार हमी योजनेतील मजुरांना ५०० रुपये देत ग्रामसभेत आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकी आला आहे, यावर गावकर्यांनी प्रश्न उपस्थित करीत मजुरांना एकाचवेळी ग्रामसभेत व कामावर उपस्थित कसे काय असू शकतात. याबाबत गावकर्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याजवळ तक्रारीचे निवेदन दिले आहे. (जडवाहतुकीची टेन्शन संपणार, चंद्रपुरात होणार रिंगरोड)
चंद्रपूर जिल्हातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील देशी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेवरून वासेरा येथे नव्या वादाला तोंड फुटले आहे. रोजगार हमी योजनेवरील (मनरेगा) मजुरांची उपस्थिती ग्रामसभेत दाखविल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मनरेगा अंतर्गत कामावर असलेल्या तब्बल १७२ मजुरांना प्रत्येकी ५०० रुपये देऊन ग्रामसभेला आणण्यात आले. विशेष म्हणजे, रोजगार हमीच्या मस्टरवरील अनुक्रमांक आणि ग्रामसभेच्या उपस्थिती नोंदवहीतील क्रमांक समान असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच वेळी कामावर उपस्थिती आणि ग्रामसभेत उपस्थिती कशी दाखविण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.
यापूर्वीही ग्रामसभेची जाहीर नोटीस व मुनादी न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. नोटीसमध्ये स्पष्टपणे ‘दारू दुकानास ना हरकत प्रमाणपत्र’ हा विषय नमूद न करता ‘CLL-III’ असा मोघम उल्लेख करून ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गावकऱ्यांच्या तक्रारींवर प्रशासन काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रोजगार हमी योजनेच्या संभाव्य गैरवापराचा मुद्दा पुढे आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
Leave a Comment