१९ विद्यार्थी, उलट्या आणि चक्कर! शाळेतील 'त्या' गोळ्या ठरल्या विषारी? ताडोबा परिसरातील पालकांचा संताप

February 12, 2026 by Prakash Hande

Vitamin Tablet Side Effects : चंद्रपूर - जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या भामडेळी गावातील जिल्हा परिषद शाळेत विटॅमिनच्या गोळ्या घेतल्यानंतर १९ विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाली आहे. (चंद्रपूर मनपा महापौर पदग्रहण सोहळ्याला ग्रहण)

 

वर्ग पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांना शासनाच्या आरोग्य उपक्रमांतर्गत नियमितपणे विटॅमिन गोळ्या दिल्या जातात. मात्र काही दिवसांपासून या गोळ्यांचा पुरवठा झाला नव्हता. काल नव्याने गोळ्या उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला सहा गोळ्या देण्यात आल्याचे सांगितले जाते. विद्यार्थ्यांनी त्या एकाच वेळी घेतल्याने काही वेळातच डोकेदुखी, उलटी, चक्कर आदी त्रास जाणवू लागले.

 

घटनेची माहिती मिळताच पालक आणि ग्रामस्थ शाळेत दाखल झाले. शिक्षकांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती नियंत्रणात असल्याचे समजते.

 

दरम्यान, या प्रकाराबाबत शिक्षण विभाग तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, विटॅमिन गोळ्यांचे वितरण आणि मार्गदर्शन प्रक्रियेबाबत चौकशीची मागणी होत आहे.

Leave a Comment

+