वेकोलि प्रशासनाला प्रतिभा धानोरकरांचा सज्जड दम; प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी खासदार आक्रमक!

February 26, 2026 by Prakash Hande

Wani Area WCL : चंद्रपूर : प्रकल्पग्रस्त गावांच्या प्रलंबित आणि लोकहिताच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वणी क्षेत्र ताडाळी येथील क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मौजा गाडेगांव, खैरगांव, कविटगांव आणि उकनी  येथील जमिनींचे संपादन, पुनर्वसन तथा सुटलेली जमीन अधिग्रहण करण्याकरिता भूसंपादन करण्याकरिता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. जनतेच्या हक्कांच्या मागण्यांबाबत त्यांनी आक्रमक पवित्रा घेत वेकोलि प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. (माझी वसुंधरा अभियानात चंद्रपूर मनपाचा डंका)



बैठकीदरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रामुख्याने प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी योग्य जागा निश्चित करून तिथे पाणी, वीज, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या सर्व मूलभूत सुविधा प्राधान्याने पुरवण्याची मागणी केली. तसेच, एग्रीमेंटसाठी जाहीर केलेल्या ६०० पैकी १२७ जमीनधारकांच्या धर्तीवरच उर्वरित सर्व पात्र धारकांची यादी विनाविलंब प्रसिद्ध करावी आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गाडेगांव येथे 'विशेष कॅम्प' आयोजित करावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. विकास प्रक्रियेत एकाही भूमिपुत्रांवर अन्याय होऊ नये, यासाठी त्या कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



वेकोलि प्रशासनाने या सर्व मागण्यांची लवकरात लवकर दखल घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी स्पष्ट अपेक्षा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागांनी तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास जनतेच्या हितासाठी तीव्र लढा उभारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीला वणी क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी, विभागाचे प्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक एस डे तसेच वेकोलि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ तथा प्रकल्पग्रस व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

+