वरोरा हादरलं! एकाच दिवसात ३ भीषण अपघात; १७ वर्षीय तरुणाचा करुण अंत, १७ जण रक्ताच्या थारोळ्यात!

February 15, 2026 by Prakash Hande

Warora Accident News : वरोरा : वरोरा तालुक्यात रविवारी अपघातांची मालिका पाहायला मिळाली. विविध ठिकाणी घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून तब्बल १७ जण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (वरोऱ्यात नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक)

 

पुलाला मालवाहू वाहनाची जोरदार धडक

पहिली घटना वरोरा-वणी मार्गावरील पाटाळा गावाजवळ राळेगाव फाट्याजवळ घडली. रविवारी सकाळी पाटाळा येथून जरोराकडे येणारे मालवाहू वाहन रस्त्यालगतच्या पुलाला धडकले. या भीषण अपघातात भूषण विजय दोडके (वय १७, रा. पाटाळा) याचा मृत्यू झाला.

 

या अपघातात मयूर वंशिंगे, राजू किसन शिवरकर, राजू जाधव, मंथन डाहुले, लक्की भडके, नानाजी मरसकोल्हे, गणेश खापणे, मारुती शिवरकर, विनोद गौरकर, रोशन मांडवे, मारुती भटकल आणि सोहम भोयर हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

तर प्रवीण आवारी, गुरुनाथ जाधव, ओमकार मांढरे, प्रतीक पारखी आणि रोहित झाडे यांच्यावर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Warora Accident News

 

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

दुसरी घटना वरोरा-चिमूर मार्गावरील सालोरी गावाजवळ घडली. अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींची नावे समजू शकली नाहीत. त्यांच्यावरही उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

 

तिसऱ्या घटनेत दुचाकी जळून खाक

याच दिवशी तालुक्यातील आणखी एका अपघातात दुचाकी पेट घेऊन पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना समोर आली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती आहे.

रविवारी सलग घडलेल्या या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

+