Liquor License Scam : सिंदेवाही (चंद्रपूर) - चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्यावर नियमबाह्य पद्धतीने दारू दुकानांना परवानगी देण्यात आली, याबाबत मोठा भ्रष्टाचार झाला होता, बेकायदेशीर पद्धतीने दारू दुकानांना परवानगी दिल्यावर शासनाने याप्रकरणी SIT चौकशी लावली, मात्र अद्यापही चौकशी धूळखात आहे, त्याचा काय अहवाल आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यानंतरही जिल्ह्यात असे प्रकार घडतच आहे. (रोजगार हमी योजनेचे मजूर एकाचवेळी कामावर आणि ग्रामसभेत)
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वासेरा ग्रामपंचायतीत नियम, कायदे आणि शासन आदेशांना केराची टोपली दाखवत देशी दारू दुकानाला परवानगी देण्यात आल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
दारू दुकानासाठी आवश्यक असलेला निश्चित जागेचा ठराव, सर्वे क्रमांक, सीमा व नकाशा काहीच नाही, तरीसुद्धा केवळ मोघम, दिशाभूल करणाऱ्या ग्रामसभेच्या ठरावावर ‘ना-हरकत’ देण्यात आली. हा प्रकार म्हणजे थेट ग्रामसभेची फसवणूक असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार दारू दुकानासाठी निश्चित जागा बंधनकारक असताना, संबंधित सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगनमताने नियम धुडकावल्याचा गंभीर आरोप होत आहे.
या निर्णयामुळे गावातील शाळा, देवस्थान, वस्ती, महिला व तरुणांवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आहे.
ग्रामस्थांनी हा ठराव तत्काळ रद्द करून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषी सरपंच व सचिवांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून, गटविकास अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.
Leave a Comment