चंद्रपूर / सिंदेवाही: सिंदेवाही पतीला मारहाण प्रकरणी पोलिसांनी पत्नी, सासू आणि चुलत सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील जुना विरव्हा येथे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. पतीच्या तक्रारीनुसार घरगुती सामानाबाबत विचारणा केल्यावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत अक्षय मेश्राम (वय ३०) यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्यावर सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. (दुर्गापुरात मजुरांवर हल्ला, तिघांवर गुन्हे दाखल, वाचा हि बातमी)
सिंदेवाही पतीला मारहाण : जुना विरव्हा येथे नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, जुना विरव्हा येथील रहिवासी अक्षय भगवान मेश्राम (वय ३०) यांचा सन २०२० मध्ये गावातीलच शितल मुकुंदा धारणे (वय २७) हिच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांना अंशिका ही चार वर्षांची मुलगी आहे. मात्र, काही काळाने पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाल्याने मागील पाच महिन्यांपासून शितल आपल्या मुलीसह जुना विरव्हा येथेच आईच्या घरी राहू लागली होती.
घरगुती सामानाच्या विचारणेवरून वाद
दरम्यान, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास अक्षय मेश्राम हे आपल्या सासूच्या घरी गेले. त्यांनी पत्नी शितलला एकांतात बोलण्याचे सांगून, एमआयडीसी चंद्रपूर येथील भाड्याच्या खोलीत राहताना वापरत असलेले घरगुती सामान, भांडे, कुलर व गॅस सिलेंडर खोलीवर नसल्याबाबत विचारणा केली. यावर संतप्त झालेल्या पत्नीने “तू माझ्या आईच्या घरी यायचे नाही, माझा-तुझा काही संबंध नाही” असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद वाढताच अक्षय यांची सासू विमला मुकुंदा धारणे (वय ५०) आणि चुलत सासू विजया संदीप धारणे (वय ४०) तिथे आल्या. त्यांनी अक्षयला शिवीगाळ करत “याला मारल्याशिवाय राहत नाही” अशी धमकी दिली. सासू विमला हिने घरातील बांबूची काठी आणून अक्षय यांच्या डोक्यावर सपासप मारली, ज्यामुळे त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर पत्नी शितल हिनेही तीच काठी हिसकावून अक्षय यांच्या उजव्या हातावर प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अक्षय यांना चक्कर येऊन ते खाली कोसळले. खाली पडल्यानंतरही तिन्ही महिलांनी त्यांना लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली.
घटनेनंतर जखमी अवस्थेत उठून चौकाकडे जात असताना अक्षय यांचे वडील भगवान पांडुरंग मेश्राम व काका जिवनदास पांडुरंग मेश्राम यांनी त्यांना पाहिले आणि तात्काळ उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.
या घटनेप्रकरणी पीडित पती अक्षय मेश्राम यांच्या तोंडी तक्रारीवरून सिंदेवाही पोलिसांनी आरोपी पत्नी शितल मेश्राम, सासू विमला धारणे आणि चुलत सासू विजया धारणे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन डोंगरे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






