Warora Crime News police arrest goat theft accused in Chandrapur

सावधान आता आली बकरे चोरणारी टोळी, चंद्रपुरातील बकरी चोर, लाखोंचा मुद्देमाल जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 29, 2026

वरोरा: Warora Crime News वरोरा पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागात सतर्कता दाखवून मोठी कारवाई केली आहे. मजरा (रै.) येथील बकरी चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला. चंद्रपूर येथील तीन अट्टल चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ५.७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (हे हि वाचा – वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार)

शहरासह ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी वरोरा पोलिसांनी सतर्कता दाखवत बकरी चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणात चंद्रपूर येथील तीन अट्टल चोरांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या ५ बकऱ्यांसह गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व दुचाकी असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? वरोरा तालुक्यातील मजरा (रै.) येथील रहिवासी व रोजमजुरी करणारे किशोर अशोक कोल्हे (वय ४०) यांनी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे आपली जनावरे चारून आणल्यानंतर गोठ्यात बांधून ठेवली होती. मात्र, २८ ऑगस्ट रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून काळ्या-पांढऱ्या ठिपक्यांच्या ३ बकऱ्या, १ काळा बोकड आणि १ लालसर रंगाची पाठ अशी प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीची एकूण २५ हजार रुपयांची ५ जनावरे लंपास केली. याप्रकरणी किशोर कोल्हे यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या आधारे आरोपी जेरबंद

गुन्हा दाखल होताच वरोरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. या कारवाईत पोलिसांनी चंद्रपूर येथील तीन आरोपींना ताब्यात घेतले:

यामध्ये सुरज शिवगीरी सोळंकी (वय २७, रा. इंदिरा नगर, चंद्रपूर), खुबलाल हिरासिंग ठाकुर (वय २५, रा. संजय नगर, चंद्रपूर), राकेश राजेंद्र महतो (वय ३८, रा. शाम नगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर) यांचा समावेश असून पोलिसी खाक्या दाखवताच या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली २५ हजार रुपयांची ५ बकरे हस्तगत केली. तसेच चोरीच्या गुन्ह्यासाठी वापरलेली ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 12 FU 8819) आणि ४५ हजार रुपये किमतीची होंडा मोटरसायकल (क्रमांक MH 34 CC 4354) असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल आणि ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भसमे, पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गौरकार व तपास पथकाने केली. तक्रार दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत आरोपींना गजाआड करून चोरी गेलेला माल परत मिळवून दिल्याबद्दल फिर्यादीने वरोरा पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment