सोनार समाजातील विखुरलेल्या बांधवांना एका छत्राखाली आणून समाजाचा उत्कर्ष साधावा – रवि चावरे

News34

चंद्रपूर – सोनार समाजाचा उत्कर्ष साधायचा असेल तर सर्वप्रथम समाज बांधवांना वेगवेगळया पोटजातीमध्ये विखुरलेल्या समाजबांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजातील बुध्दीजीवी, नोकरी पेशातील बांधवांनी समाज ऋणाची परतफेड करण्याकरिता संपूर्ण समाजाला एका छत्राखाली आणून त्यांच्या सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासाला कशी चालना मिळेल याकरिता विचारमंथन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन समाजाचे युवा नेतृत्व तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहीर यांचे स्वीय सहायक रवि चावरे यांनी केले.

चंद्रपूर सोनार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने आयोजित संत श्री नरहरी महाराज यांच्या 828 व्या जयंती महोत्सवानिमित्त उद्घाटक म्हणून ते बोलत होते. स्थानिक संत तुकडोजी भवन, नागपूर रोड येथे आयोजित या कार्यक्रमास मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल चावरे, कार्यक्रमाचे अतिथी भुषण गजपूरे, अॅड प्रशिक ताठे, सुबोध कासुलकर, विनोद पांढरे, श्री रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते.

समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना रवि चावरे यांनी सांगीतले की,समाजात पोटजातींना घेवून दुजाभाव न करता त्यांना सामाजिक प्रवाहात येण्याकरिता संस्थेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे, समाजामध्ये अनेक कुटूंबात प्रज्ञावंत मुले असतांनाही आर्थिकदृष्टया ते शैक्षणिक प्रगती करण्यास असमर्थ असल्याने अशा मुलांचा शोध घेवून सामाजिक स्तरावर त्या कुटूंबांना सहाय्य करण्याची भुमिका स्विकारल्या गेली किंवा अशा गुणवंत विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती सारखी मदत मिळाली तर आपला समाज कुठेही मागे राहणार नाही.

ज्या संत नरहरी महाराजांचे पाईक म्हणून आपण त्यांचेवर श्रध्दा ठेवतो. परंतु, महाराजांचे सामाजिक उत्थानासाठीचे विचार त्यांचे संदेश किंवा त्यांच्या कर्तृत्वाबाबत आपण अनभिज्ञ आहोत. त्यामुळे समाजातील युवकांनी, समाज बांधवांनी या विचाराचा प्रचार व प्रसार करण्याचे कर्तव्य पार पाडावे असेही आपल्या संबोधनातून रवि चावरे यांनी सांगीतले.

तत्पूर्वी मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व अन्य मान्यवरांनी समाज बांधवांना मौलीक मार्गदर्शन केले. याप्रसंगी रक्तदान शिबीर, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातील सेवानिवृत्त बांधवांना याप्रसंगी शाल व श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास माता भगिणींसह समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!