Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाचंद्रपुरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण व शिष्यवृत्ती मिळणार

चंद्रपुरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण व शिष्यवृत्ती मिळणार

सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर आढावा

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर: स्वच्छता हीच सेवा असून सफाई कर्मचारी स्वच्छतेचे काम करून देशाची मोठी सेवा करीत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी.वावा यांनी दिले.

 

नियोजन भवन येथे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, वनअकादमीच्या अपर संचालक मनीषा भिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

डॉ. पी.पी.वावा म्हणाले, सर्वप्रथम येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या असलेल्या समस्यांचे निराकरण प्राधान्याने करावे. स्थायी अथवा  कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे. त्यांचा ब्लड ग्रुप, इन्शुरन्स सुविधा, पीएफसह मासिक वेतन प्रमाणपत्र द्यावे. या कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवाव्यात तसेच आरोग्य तपासणीचे कॅम्प आयोजित करावे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ द्यावा. कर्मचाऱ्यांचे किमान वेतन, कोर्ट व प्रलंबित प्रकरणांमध्ये त्वरित कार्यवाही करावी. येथील सफाई कर्मचाऱ्यांना वास्तव्यास राहण्यासाठी अजूनही पक्के घर नाही. त्यासाठी आवश्यकतेनुसार प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उपलब्ध करून द्यावी.

 

ते पुढे म्हणाले, येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा त्यांचा परंपरागत व्यवसाय असल्याने त्यांना जात प्रमाणपत्र  देण्याचे नियोजन करावे. रोजगार व स्वयंरोजगारासाठी बँकेमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण तसेच शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल. तसेच  शासनाच्या विविध विभागाच्या वतीने सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या व प्रशिक्षणाच्या योजनांचा लाभ मिळवून देत त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, असेही ते म्हणाले.

 

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना लागणारी कागदपत्रे, त्याच्या घरांचा प्रश्न देखील सोडविण्यात येईल, असे डाॅ. वावा यांना आश्वासित केले. यावेळी सफाई कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या सदस्यांसमोर मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!