Monday, May 27, 2024
Homeक्रीडाशासन निर्णयाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी रस्त्यावर

शासन निर्णयाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी रस्त्यावर

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur
चंद्रपूर – शासकीय नोकरीचे खासगीकरण व शिक्षणाचे कंत्राटीकरण या शासन निर्णयाविरोधात चंद्रपुरात शिक्षण व नोकरी बचाव समितीने जन आक्रोश मोर्चा काढत सरकारचा निषेध नोंदविला.

 

महाराष्ट्र शासनाने खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्या विरोधामध्ये आज चंद्रपुरात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बेरोजगार युवक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या स्वयंस्फूर्तीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात दीक्षाभूमी परिसरातून करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित झाले होते. हातात फलक आणि घोषणाबाजी करत या मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

 

खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा निर्णय हा त्वरित मागे घ्यावा या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी एकजूट झाले. सोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील या मोर्चात पाठिंबा दर्शवण्यासाठी सहभागी झाले.

 

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा मोर्चा निघण्यापूर्वी काही राजकीय पक्षाच्या अतिउत्साही पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा आमच्या पक्षाचा आहे असे दर्शविले होते, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाईने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

शिक्षण व नोकरी बचाव समितीद्वारे आयोजित ह्या मोर्च्यात हजारोच्या संख्येत तरुणाई सामील झाली.

आश्वासन नको, अध्यादेश काढावा

कंत्राटी भरतीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर आंदोलने केली जात आहेत. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. परंतु, उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेने चंद्रपुरातील आंदोलनकर्त्यांचे समाधान झालेले नाही. राज्यातील युवकांविषयी तळमळ असेल, तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंबंधीचा शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोबतच सप्टेंबर महिन्यात काढलेले सर्व शासन निर्णय, परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने करण्यात आली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असेही सांगण्यात आले.

 

तरुणाईची मुख्य मागणी

 

उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शिक्षण व विविध विभागात मनुष्यबळ बाह्ययंत्रणेमार्फत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय नोकरी हा महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणाचा हक्क आहे. मात्र, राज्य शासन बाह्ययंत्रणेमार्फत पदभरती करून सुशिक्षित बेरोजगारांचे शोषण करण्याचे परवाने वाटप करीत आहे. शासनाने सदर आदेश तत्काळ रद्द करून सर्व विभागातील रिक्त जागेवर कायमस्‍वरूपी पदभरती करावी, ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, एनपीएस रद्द करून शिक्षक-राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, एमपीएससी व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्‍पर्धा परिक्षेचे शुल्‍क कमी करून १०० रुपये ठेवावे, आयबीपीएस, टीसीएस किंवा इतर खासगी संस्‍थामार्फत विविध पदाच्या स्‍पर्धा परीक्षा न घेता सर्व परीक्षा एमपीएससी आयोगाद्वारे घेण्यात याव्‍या, विविध शासकीय पदभरतीसाठी होणाऱ्या स्‍पर्धा परीक्षेतील पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा, विद्यार्थी हितासाठी २० पटाखालील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी समूह शाळा संकल्‍पना रद्द करणे, राज्‍य शासनातील शासकीय कार्यालयातील रिक्‍त पदे व अनुदानित संस्‍थेमधील शिक्षक- प्राध्यापकांची रिक्‍त पदे तत्काळ भरावी आदी मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

जन आक्रोश मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले. यावेळी राज्‍यातील विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, शिक्षक, राज्‍य कर्मचाऱ्यांना न्‍याय द्यावा अन्‍यथा शिक्षण-नोकरी बचाव समिती जिल्‍हा चंद्रपूरच्या वतीने सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करून राज्‍यव्‍यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने देण्यात आला.

जनआक्रोश मोर्चात शिक्षण – नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरचे सर्व सदस्य यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विविध विभागातील शासकीय कर्मचारी, विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुधाकर अडबाले, आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार प्रतिभा धानोरकर हे मोर्चात प्रामुख्याने सहभागी झाले होते.

मोर्चातील मागण्यांवर विद्यार्थ्यांनी शासनाप्रती रोष व्यक्त केला. त्यानंतर विविध महापुरुषांच्या वेशभुषेतील युवक-युवतींच्या हस्ते निवासी जिल्हाधिकारी यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले व सदर मागण्यांचे निवेदन शासनाकडे तात्काळ पाठविण्यात येईल, अशी ग्वाही दिली. शेवटी शपथ घेऊन राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.

 

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!