News34 chandrapur
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. या वाळू तस्करीला तारडाचे सरपंच तरुण उमरे, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर लखमापुरे एका महिला ग्रा.पं.सदस्याने विरोध केल्याने वाळू तस्करांनी या तिघांवरही प्राणघातक हल्ला करून जखमी केले. या प्रकरणात शिवसेना (उबाठा) वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकरसह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाला गोंडपिपरीचे एसडीओ, तहसीलदार, अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे आणि खनिकर्म अधिकारी नैताम तेवढेच जबाबदार असून, या सर्व अधिकाऱ्यांना या हल्ल्याप्रकरणी जबाबदार ठरवून गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाइं (आठवले गट) महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पा मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा घाटावरून शासनाचे नियम डावलून रेती उत्खनन सुरू आहे. रेतीघाटधारक अक्षय चांदेकर हे पोकलेन, जेसीबी मशीने रेतीघाट पोखरत आहेत. दररोज रेती तस्करीच्या वाहतुकीमुळे तारडा गाववासीयांची झोप उडाली असून, तारडाचे सरपंच तरुण गंगाराम उमरे, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर लखमापुरे आणि एका महिला ग्रामपंचायत सदस्यांने नदीपात्राकडे धाव धेत रेती उत्खननाला विरोध केला. यावेळी या तिघांवरही अक्षय चांदेकर आणि त्याच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याचा मास्टर माइंड शिवसेना वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांना अटक करण्यात आली तर काशीकर हा फरार असल्याचे पोलीस सांगत आहेत. परंतु, हा हल्ला पूर्वनियोजित असून, रेतीघाटधारक अक्षय चांदेकर यांनी महसूलचे अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे यांना हाताशी धरून हा हल्ला केल्याचा आरोप पुष्पा मोरे यांनी केला आहे.
चांदेकर यांनी परवानगी मिळालेल्या क्षमतेपेक्षा दहा पट अधिक ब्रासरेतीचे उत्खनन केले आहे. रेती घाटावरील सीसीटीव्ही फूटेज आणि स्टॉक यार्ड, जीपीएस ट्रेकिंग याची चौकशी केल्यास या घाटावरील वाळूचोरीचे मोठे गौडबंगाल उजेडात येणार आहे.
परंतु, अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच लावण्यात आले नाही. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीनेचे रेतीघाट धारकाकडून रेतीघाट पोकलेन आणि जेसीबीने पोखरला जात असल्याचा आरोप मोरे यांनी यावेळी केला. जिल्ह्यातील रेतीघाटांवरून मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेतीचे उत्खनन सुरू असून, गुन्हेगारी वाढत आहे. अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळेच कुलथा घाटावरील घटना घडली असून, या महसूल अधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटी ॲक्टअन्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच सरपंच आणि तंमुस अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
अशी होते वाळू तस्करी…
चंद्रपूर जिल्ह्यात आज असंख्य वाळू तस्कर सक्रिय आहे, नियमाप्रमाणे वाळू घाट घेतल्यावर 1 हजार ब्रास च्या ऐवजी हे तस्कर 10 हजार ब्रास वाळू उत्खनन करतात, प्रशासन द्वारा वाळू घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमरे व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस सिस्टम बसविल्या जातो, मात्र वाळू तस्कर ज्या वाहनांवर जीपीएस सिस्टम लावला असतो ते वाहन शट डाऊन दाखविण्यात येते आणि दुसऱ्या वाहनाने वाळूची अवैधरित्या वाहतूक करण्यात येते.
प्रशासनाची अर्थपूर्ण भूमिका…
खनिज संपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात वाळू तस्कर तलाठी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, खणीकर्म अधिकारी व स्थानिक यांच्याशी ओळखी करीत सलोख्याचे संबंध स्थापित करतात आणि मग सर्वांशी अर्थपूर्ण व्यवहार सुरू करीत हा गोरखधंदा सुरू करण्यात येतो.
दरवर्षी शासनाला यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुना लागतो विशेष बाब म्हणजे प्रशासनातील अधिकारी महसूल विभागाला चुना लावण्याचे काम करीत असतो, त्यामुळे वाळू तस्कर कुणाच्याही नियंत्रणात नसतात, त्यामुळे मुजोरी व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधामुळे हे काहीही करायला तयार असतात हे विशेष.
या वाळू तस्करीला जबाबदार तस्कर नसून तर त्यांच्याशी हातमिळवणी करणारे प्रशासनातील अधिकारी आहे, ज्यादिवशी या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रारंभ होणार त्यादिवशी हे अवैध धंदे पूर्णतः बंद होणार.