चंद्रपूर: Minor Girl Missing या धक्कादायक घटनांनी चंद्रपूर जिल्ह्यात चिंता वाढवली आहे. चिमूर तालुक्यातील भिसी आणि भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे दोन अल्पवयीन मुली वेगवेगळ्या घटनांमध्ये बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून वाढत्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (बल्लारपुरात १३ वर्षीय मुलगी बेपत्ता)
Minor Girl Missing प्रकरणात पोलिसांची तपासमोहीम
पहिली घटना चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. ती मुलगी स्थानिक कॉलेजमध्ये १२ वीत शिकत असून, ४ जून २०२६ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजताच्या सुमारास तिच्या वडिलांसोबत दुचाकीने ट्युशनसाठी भिसी येथे आली होती. मात्र, दुपारपर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचे कॉलेज, बस स्टॉप, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींकडे शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर याप्रकरणी भिसी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार बालकृष्ण जिभकाते पुढील तपास करत आहेत.
दुसरी घटना भद्रावती तालुक्यातील मौजा मुधोली येथे घडली आहे. येथे राहणारी एक १५ वर्ष ७ महिने वयाची अल्पवयीन मुलगी, जी इयत्ता ९ वीत शिकते, ती गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ती तिच्या लहान बहिणीसोबत गावातीलच एका लग्नाला जाते म्हणून घरातून निघाली होती. रात्री ८ वाजता तिची लहान बहीण एकटीच घरी परतली आणि तिने मोठी बहीण कोणालाही न सांगता निघून गेल्याचे आईला सांगितले. त्यानंतर आईने लग्नकार्याच्या ठिकाणी, गावात, बस स्टँड आणि सर्व नातेवाईकांकडे मुलीचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही.
५ जून २०२६ रोजी पीडित मुलीच्या आईने भद्रावती पोलीस ठाण्यात मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. भद्रावती पोलिसांनी याप्रकरणी बीएनएस कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस निरीक्षक वीरेंद्र देवदास केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात वाढत्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.