चंद्रपूर: Chandrapur Bhondu Baba प्रकरणात चंद्रपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगून एका हतबल कुटुंबाला २५ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. पतीच्या आजारपणाचा गैरफायदा घेत भोंदू महिलांनी अघोरी पूजेच्या नावाखाली ही फसवणूक केली. चंद्रपूर शहर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत या तिन्ही भोंदू महिलांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विद्या विठ्ठलराव निमजे, शाहिस्ता अंजुम मोहम्मद शकील शेख आणि शबनम अशी गजाआड झालेल्या संशयित महिलांची नावे आहेत. (हे हि वाचा – चंद्रपुरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट)
पतीच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन रचला अंधश्रद्धेचा मायाजाल
शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, चंद्रपूर येथील जोड देऊळ पठाणपुरा वॉर्डातील तक्रारदार वैशाली अनिल खणके यांची जमीन इराई नदीच्या पुलासाठी संपादित झाली होती. या जमिनीचा मोबदला म्हणून त्यांना ७१ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली होती. पती गंभीर आजारी असल्याने घरातील आर्थिक आणि व्यावहारिक सूत्रे वैशाली या स्वतः सांभाळत होत्या. याच दरम्यान त्यांच्या शेजारी भाड्याने राहण्यास आलेल्या विद्या निमजे हिने वैशाली यांच्याशी जवळीक साधली. वैशाली यांच्या घरातील हतबलतेचा आणि मानसिक परिस्थितीचा गैरफायदा घेत विद्याने त्यांच्या मनात भ्रमाचे जाळे विणण्यास सुरुवात केली.
“तुझ्या पतीला मी माझ्या दैवी शक्तीने पूर्ण बरे करते,” असा दावा करत विद्याने सुरुवातीला वैशाली यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांचे दाखले देत हप्त्या-हप्त्याने ५ लाख २५ हजार रुपये चेकद्वारे काढून घेतले. भोंदू महिलेची हाव एवढ्यावरच थांबली नाही; ती नित्यनियमाने वैशाली यांच्या घरी येऊन बसत असे आणि तावीज, चिठ्ठी तसेच धुनीची पावडर पाण्यात टाकून प्यायल्यास प्रकृतीत सुधारणा होईल असा भास निर्माण करत राहिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात “घराचे कल्याण होईल” असे सांगून तिने वैशाली यांच्या कानातील सोन्याचे टॉप्स आणि गळ्यातील सोन्याची पोतही काढून घेतली.
बँकेतून १०-१० लाख रुपये काढून हडपले; भाडेकरू महिला ठरली मुख्य सूत्रधार
अंधश्रद्धेची ही जादूटोण्याची मालिका इथेच संपली नाही. २४ जुलै रोजी विद्याने वैशाली यांना थेट बँकेत नेऊन १० लाख रुपयांची रोख रक्कम काढायला लावली आणि ती स्वतःकडे घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २५ जुलै रोजी पुन्हा घरी येऊन घर खरेदीसाठी ठेवलेले आणखी १० लाख रुपये घेऊन ती पसार झाली. हडप केलेल्या या रकमेतील काही हिस्सा तिने शाहिस्ता अंजुम आणि शबनम या आपल्या साथीदारांकडे दिला होता.
इतका मोठा आर्थिक भुर्दंड सोसून आणि अघोरी उपाय करूनही पतीच्या प्रकृतीत कोणताही सुधार न झाल्याने आणि पैसे दुप्पट होण्याचे आमिष फोल ठरल्याने वैशाली यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी विद्याकडे आपले पैसे परत मागितले असता “माझ्याकडे पैसे नाहीत, सगळे खर्च झाले” अशी उडवाउडवीची उत्तरे तिने दिली. स्वतःची फसवणूक झाल्याची खात्री पटताच वैशाली यांनी तात्काळ चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रारीचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित कारवाई केली. आरोपींविरुद्ध ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्या’न्वये गुन्हा दाखल करून तिन्ही महिलांना तत्काळ बेड्या ठोकल्या. पोलिसांनी कारवाईदरम्यान त्यांच्याकडून तावीज, अघोरी पूजेचे साहित्य आणि अंधश्रद्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास शहर पोलीस करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






