चंद्रपूर: Chandrapur Dog Attack चंद्रपूर शहरातील शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या छत्रपती नगर भागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव अतिशय गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. या परिसरात एकाच हिंस्र मोकाट कुत्र्याने तब्बल ५२ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मनपा प्रशासनाकडून या समस्येकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले. (लोकाधिकार सेना जिल्हाध्यक्षपदी गोमती पंचभाई यांची नियुक्ती)
छत्रपती नगर परिसरात सध्या १५ ते २० मोकाट कुत्र्यांचा समूह (झुंड) तयार झाला असून, हे कुत्रे नागरिकांवर आणि विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांवर प्राणघातक हल्ले करत आहेत. रस्त्याने चालताना कुत्रे अंगावर धावून येणे, जोराने भुंकणे आणि नागरिकांना खाली पाडणे अशा घटना रोजच्याच झाल्या आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, नागरिकांना घराबाहेर पडताना सुरक्षेसाठी हातात काठी किंवा दंडा घेऊन निघावे लागत आहे.
मनपा प्रशासनाचा ‘फार्स’ आणि श्वान पथकाचे अपयश
प्रशासनाचा ‘फार्स’ आणि आयुक्तांचे बेजबाबदार उत्तर नागरिकांनी तक्रार केल्यानंतर मनपा प्रशासन केवळ नावाला श्वान पकडणारी गाडी पाठवते. कर्मचार्यांकडून एखादे-दुसरे कुत्रे पकडले जाते आणि पुढे नेऊन सोडले जाते. मात्र, संध्याकाळपर्यंत हेच कुत्रे पुन्हा त्याच भागात परत येतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात मनपा पूर्णपणे अपयशी ठरली आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून मोकाट कुत्र्यांसाठी ‘शेल्टर होम’ (Shelter Home) ची व्यवस्था करावी आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) चे महानगर प्रमुख व माजी नगरसेवक सुरेश पचारे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि प्रमोद पाटील यांच्या शिष्टमंडळाने आज (१० ऑगस्ट २०२६) मनपा आयुक्त अकानुरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मात्र, निवेदन स्वीकारल्यानंतर आयुक्त अकानुरी यांनी अत्यंत बेजबाबदार उत्तर देत, “त्या भागातील सर्व कुत्र्यांचे लसीकरण झाले आहे, यावर पुढे आम्ही काही करू शकत नाही,” असे सांगत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या या अस्वस्थ करणाऱ्या भूमिकेमुळे मनपा एखाद्या लहान मुलाचा किंवा नागरिकाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नाल्यांची सफाई आणि फवारणीचीही मागणी या निवेदनाव्दारे शास्त्रीनगर प्रभाग क्र. २ मध्ये नियमित नाली सफाई व जंतुनाशक फवारणी होत नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. नाल्या तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मनपा प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करून नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






