चंद्रपूर: Chandrapur Ramnagar Assault Case मध्ये दुकानावर जाहिरातीचा बोर्ड लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेचा विनयभंग व तिला आणि तिच्या मुलाला मारहाण झाल्याची घटना बंगाली कॅम्प परिसरातील शितला माता मंदिराजवळ घडली. तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक अजय सरकार व त्यांच्या कुटुंबीयांसह इतरांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाण व तोडफोडीच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. (चंद्रपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्यारबंद युवकाला अटक, वाचा गुन्हेगारी बातमी)
बंगाली कॅम्प परिसरात जाहिरात बोर्डावरून सुरू झाला Chandrapur Ramnagar Assault Case
मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तक्रारदार महिलेच्या दुकानातील बिस्किटांची विक्री जास्त झाल्यामुळे कंपनीकडून दुकानासमोर जाहिरातीचा बोर्ड लावण्यासाठी मालवाहू गाडीसह कर्मचारी आले होते. दुकानासमोर पुरेशी जागा नसल्याने शेजारी राहणाऱ्या भाजप कार्यकर्ते व माजी नगरसेवक अजय सरकार यांच्या घरासमोर गाडी उभी करून कर्मचारी बोर्ड लावण्याचे साहित्य काढत होते. यावरून अजय सरकार, त्यांचा मुलगा, पत्नी, मुलगी यांनी बोर्ड लावण्यास तीव्र विरोध करत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
ओरडण्याचा आवाज ऐकून तक्रारदार महिला व तिचा मुलगा मदतीसाठी धावले आणि त्यांनी कंपनी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घराच्या आत बोलावून घेतले. मात्र, अजय सरकार व त्यांचा मुलगा हे जबरदस्तीने घराच्या आत शिरले. तक्रारदार महिलेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता अजय सरकार याने तिचे हात पकडून, गळा दाबून, पोटावर लाथ मारली आणि असभ्य वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच, अजय सरकार यांच्या मुलाने फावडा घेऊन घरात शिरून धक्काबुक्की करत मारहाण केली, तर मुलीने दुकानातील वस्तूंची तोडफोड केली.
या दरम्यान बाहेर उभी असलेली तक्रारदार महिलेची होंडा फॅशन गाडी (क्रमांक MH 34 CT 7616) अजय सरकार याने खाली पाडून तिची नंबर प्लेट तोडून नुकसान केले. या घटनेच्या वेळी सोबत असलेल्या काही व्यक्तींनी तक्रारदार महिला व तिच्या मुलाला जीवाने मारण्याची धमकीही दिली.
या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीवरून अजय सरकार व त्यांच्या कुटुंबासह श्रीनिवास व अनोळखी ३ इसम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ७४ (विनयभंग), ३३३, ३५१(२), ३५२, ११५(२), २९६, ३२४(४), १८९(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(१), १९१(२) आणि १९१(३) अन्वये गुन्हा (प्रथम खबर क्र. ११३३/२०२६) दाखल केला असून रामनगर पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






