धाबा (गोंडपिपरी): वाघाचा हल्ला झाल्याने गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली शेतशिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी शेतातील काम आटोपून बैलांसह घराकडे परतणाऱ्या रोजा शिवमोहन उराडे यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धाबा वनपरिक्षेत्रातील चेकमधून सोमनपल्ली परिसरात ही घटना घडली. हल्ल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची विचारपूस केली. तसेच घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वाचा हि बातमी)
सोमनपल्ली शेतशिवारात वाघाचा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, रोजा उराडे या सायंकाळच्या वेळी शेतातील रोजची कामे आटोपून बैलांना सोबत घेऊन घराकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी शेताच्या बांधावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर आणि बैलांवर झडप घेतली. वाघाच्या अनपेक्षित हल्ल्यामुळे बैल प्रचंड घाबरले आणि त्यांनी सैरावैरा धाव घेतली. बैलांच्या या गडबडीत आणि निर्माण झालेल्या गोंधळात वाघाने रोजा उराडे यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जखमी केले.
बैलांवरही झडप, मात्र हल्ल्याचा प्रयत्न फसला
दरम्यान, वाघाने एका बैलालाही ओढून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र बैलांनी प्रसंगावधान राखून तेथून पळ काढल्याने वाघाचा तो प्रयत्न फसला. या अचानक झालेल्या घटनेमुळे सोमनपल्ली व लगतच्या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तत्परता दाखवत गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. क्षेत्र सहाय्यक एम. डी. पेंदोर, वनरक्षक एस. जी. नगारे, वनरक्षक सोनी मरमुरीवार, वनरक्षक भिवापूरे मॅडम तसेच गोंडपिपरीचे वनरक्षक एस. जी. झारखंडे आदी वनकर्मचाऱ्यांनी रुग्णालयात उपस्थित राहून जखमी महिलेची विचारपूस केली आणि घटनेचा सविस्तर पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली.
धाबा व गोंडपिपरी तालुक्यातील शेतशिवारात वन्यप्राण्यांचा, विशेषतः वाघाचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. वनविभागाने केवळ पंचनामा न करता या नरभक्षक किंवा हिंसक वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






