birthday celebration with social message : पोंभुर्णा, उमरी पोतदार: वाढदिवस म्हणजे मौजमजा आणि मित्र-मैत्रिणींसोबतचा आनंद. पण पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथील ११ वर्षीय सिया मंगेश उपरे हिने आपला वाढदिवस एका वेगळ्याच पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, उमरी पोतदार येथे इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या सियाने आपल्या वाढदिवसानिमित्त गावातीलच एक अनाथ बालिकेला शालेय वस्तू भेट देऊन तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.
नझूलधारकांना मिळणार कायमस्वरूपी पट्टे
सियाच्या या कृतीने उपस्थितांचे डोळे पाणावले आणि सर्वांनी तिच्या दातृत्वाची भरभरून प्रशंसा केली.
रेणुका साईनाथ कोडपे नावाची ही अनाथ बालिका तिचे आई-वडील गमावल्याने तिच्या वृद्ध आजीसोबत राहत आहे. रेणुकाची परिस्थिती पाहून सियाच्या मनात तिच्याबद्दल नेहमीच आपुलकी आणि प्रेम होते. 'आपण तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे,' ही भावना सियाच्या मनात अनेक दिवसांपासून होती. याच भावनेतून तिने आपला वाढदिवस रेणुकाला मदत करण्यासाठी निवडला.
सिया उपरे हिचे वडील मंगेश उपरे हे अनेक वर्षांपासून गावात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ते नेहमीच गावातील शोषित आणि वंचित घटकांना मदत करण्यासाठी धावून जातात. सियाची आई, आम्रपाली उपरे, या अंगणवाडी सेविका असून रेणुका अंगणवाडीत येऊ लागल्यापासून त्या तिला मदत करत आहेत. सामाजिक कार्याचा हा वारसा सियानेही स्वीकारला असून, लहानपणापासूनच ती सर्वांसोबत मिळून-मिसळून राहते आणि मैत्रिणींमध्ये ती सर्वांची लाडकी आहे.
याप्रसंगी सियाचे आई-वडील आम्रपाली उपरे, मंगेश उपरे, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक गव्हारे सर, कोवे सर, कावरे सर आणि शाळेतील बालमित्रांच्या उपस्थितीत सियाचा हा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला. सियाच्या या कृतीने समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की, खरे समाधान इतरांना मदत करण्यातच असते.
Leave a Comment