BJP Loss in Chandrapur : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिकेतील महिला व बालकल्याण समिती तसेच झोन समित्यांच्या निवडणुकांत भाजपमधील अंतर्गत घडामोडींमुळे काँग्रेसला अनपेक्षित फायदा झाल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः प्रदेशातून आलेल्या पत्रानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राजकीय समीकरणे बदलली आणि त्याचा थेट लाभ काँग्रेसला झाला अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (अनैसर्गिक युतीला कांग्रेसने दिली धोबीपछाड)
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेविका संगीता भोयर यांनी विजय मिळवला. 12 सदस्यीय समितीत भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी 6-6 अशी समान मतसंख्या होती. मात्र, शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका डीलन केळझरकर मतदानाला अनुपस्थित राहिल्याने समीकरण बदलले. परिणामी भोयर यांना 6 मते मिळाली, तर भाजपच्या सुनीता जयस्वाल यांना 5 मतांवर समाधान मानावे लागले.
दरम्यान, झोन क्रमांक 2 आणि 3 च्या निवडणुकांमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधले. आमदार मुनगंटीवार यांनी प्रदेशातून आणलेल्या पत्रात नमूद करण्यात आलेल्या नावांव्यतिरिक्त इतर सर्व इच्छुकांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सूचनेनंतर जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले जाते.
यामुळे झोन क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार ज्योती जीवने आणि झोन क्रमांक 3 मधील उमेदवार जितेश कुळमेथे यांनी ऐनवेळी माघार घेतली. परिणामी झोन क्रमांक 2 मधून काँग्रेसच्या वैशाली चंदनखेडे यांची बिनविरोध निवड झाली, तर झोन क्रमांक 3 मधून काँग्रेसचे रामनरेश यादव विजयी झाले.
विशेष म्हणजे, झोन क्रमांक 3 मध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही उमेदवारी माघारीमुळे पराभव पत्करावा लागला. या सर्व घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला असून, आमदार मुनगंटीवार यांनी प्रदेशातून आणलेल्या पत्राचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Leave a Comment