राजुरातील Rajura Theft Case प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंदवलेली चोरीची तक्रार

राजुरात पाहुणी म्हणून आली अन् नेमकं काय करून गेली?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 23, 2026

राजुरा – Rajura Theft Case प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात एका नातेवाईक महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा येथील पेठवार्ड भागात राहणारे ६० वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी अशोक बापुराव कोवे यांच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या संशयित सुनिता परचाके हिने धान्याच्या कोठीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला. जेवण बनवण्याच्या बहाण्याने घरात दोन तास थांबलेल्या संशयित महिलेवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (पैश्यासाठी भररस्त्यात हत्या, वाचा गुन्हेगारी बातमी)

Rajura Theft Case: राजुरात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा येथील पेठवार्ड भागात भाड्याच्या घरात राहणारे ६० वर्षीय अशोक बापुराव कोवे हे महावितरणमधील (MSEB) सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. २०२३ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने आणि मे २०२६ मध्ये एकुलत्या एक मुलीचे लग्न झाल्यानंतर ते घरी एकटेच राहत होते. त्यांची मुलगी सुप्रिया ही आठवड्यातून एकदा माहेरी येऊन राहणीमान सांभाळत असे आणि स्वतःचे व मृत आईचे दागिने वडिलांच्या घरीच सुरक्षिततेसाठी ठेवत असे. गत ९ सप्टेंबर रोजी सुप्रिया आपल्या सासरी (वायगाव) जाण्यापूर्वी तिने कानातील झुमके (३ ग्रॅम), दोन डोर्ले व १७ मणी असलेली पोत (१० ग्रॅम), पुरुषांची अंगठी (१५ ग्रॅम), नाकातील नथ (१ ग्रॅम) आणि रोख ४० हजार रुपये अशी एकूण सुमारे २९ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स धान्याच्या कोठीमध्ये सुरक्षित ठेवून दिली होती.

चोरी उघडकीस कशी आली?

सासरवाडीला पोहोचल्यानंतर सुप्रियाला तिच्या मावशीचा, म्हणजेच संशयित आरोपी सुनिता परचाके (रा. नोकारी/पालगाव, ता. कोरपना) हिचा फोन आला आणि तिने सुप्रियाच्या मुक्कामाबाबत विचारपूस केली. सुप्रियाने ती सासरी आल्याचे व तिचे वडील घरी एकटेच असल्याचे सांगितले. यानंतर १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुनिता परचाके ही अशोक कोवे यांच्या घरी पोहोचली आणि जेवण बनवून देण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात गेली. साधारण दोन तास घरात थांबून ११ वाजताच्या सुमारास ती तेथून निघून गेली.

त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता अशोक कोवे आंघोळीसाठी पाणी गरम करण्यास गेले असता त्यांना कोठीचे कुलूप उघडे दिसले. शंका आल्याने त्यांनी कोठी उघडून पाहिली असता त्यातील दागिन्यांची पर्स गायब असल्याचे आढळले. त्यांनी तात्काळ मुलीला फोन करून बोलावून घेतले. सुप्रियाने घरी येऊन पाहणी केली असता ९ हजार रुपये किमतीचा कानातील झुमक्याचा जोड, ३० हजार रुपये किमतीची पोत व डोर्ले, ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ३ हजार रुपये किमतीची नथ असे ८७ हजार रुपयांचे २९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पर्समधील १० हजार रुपयांची रोकड असा एकूण ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

राजुरा पोलिसांकडून गुन्हा दाखल आणि पुढील तपास

घरच्या नातेवाईक महिलेनेच हा विश्वासघात केल्याचा दाट संशय असल्याने आणि ती जवळची नातेवाईक असल्याने तक्रार देण्यास काही दिवस विलंब झाला. मात्र, शेवटी २२ सप्टेंबर रोजी अशोक कोवे यांनी राजुरा पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला आणि तोंडी तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी संशयित महिला सुनिता परचाके हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ठाणे अंमलदार नितीनकुमार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनुप डांगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment