चंद्रपूर: Tree Plantation Drive निमित्त चंद्रपूरच्या बाबूपेठ परिसरात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला बचत गट, रणरागिणी महिला पतसंस्था आणि सावित्री बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बजरंग क्रीडा संकुल परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुजा मुंधडा यांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (चंद्रपुरात युवासेनेची सडेतोड वक्तृत्व स्पर्धा)
बाबूपेठमध्ये Tree Plantation Drive उत्स्फूर्त प्रतिसाद
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. ऋतुजा मुंधडा यांनी चंद्रपूर शहरातील वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. त्या म्हणल्या की, चंद्रपूर शहर सध्या प्रदूषणयुक्त वातावरणाचा सामना करत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर त्यांचे योग्य संगोपन करणे ही काळाची गरज बनली आहे. तरच आपण येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा आणि चांगले पर्यावरण देऊ शकू. या सामाजिक उपक्रमासाठी चंदाताई वैरागडे यांच्या नेतृत्वात महिलांनी घेतलेला पुढाकार आणि केलेले सुंदर नियोजन अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित सर्व महिलांची पाठ थोपटली.
कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक सौ. चंदाताई वैरागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, त्यांच्या संस्थांच्या वतीने दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेगवेगळ्या परिसरात वृक्षारोपण करून त्या झाडांचे नियमित संगोपन केले जाते. याच परंपरेनुसार यावर्षी बजरंग क्रीडा संकुलात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून, त्यांच्या संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी महिलांनी घेतली आहे. बचत गटाच्या माध्यमातून केवळ आर्थिक प्रगतीच नव्हे, तर महिला एकत्र येऊन विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य करत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. यावेळी कु. सुहानी उमरे या चिमुरडीने वृक्षारोपणाचे महत्त्व अत्यंत सोप्या शब्दांत पटवून दिले, ज्याचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.
या पर्यावरणपूरक कार्यक्रमाला महिला बचत गटांच्या सन्माननीय अध्यक्षा व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने रेखाताई वैरागडे, वैशालीताई ऐसेकर, निताताई चन्ने, सुषमाताई पोटे, शुभांगीताई कंदलवार, सुवर्णाताई भारस्कर, वर्षाताई साखरकर, उषाताई तंगडपल्लीवार, संगीताताई जवादे, नम्रताताई मोरे, अंजुताई वैरागडे, संगीता टवलारकर, सुरेखाताई नेदनूरवार, उज्वलाताई मुसळे, सिंधूताई मिश्रा, गीताताई धकाते, पुष्पाताई धकाते, उषाताई धामनगे, वंदनाताई पुल्लावार, अश्विनीताई आसेकर, नवशादताई शेख, कांचन धर्मपुरिवार आणि वैशाली कुणारपवार यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. सुवर्णाताई मत्ते यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. प्रियाताई अगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील महिलांनी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.