चंद्रपूर (News३४): chandrapur ganja raid news प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी १६.०२५ किलोग्रॅम गांजा आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त केला. एकूण १,६०,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस हवामान आनंद खरात आणि पोलीस हवामान संतोष जोरगेलवार हे दैनंदिन कामकाज करीत असताना गुप्त बातमीदाराने माहिती दिली. बगड खिडकी चंद्रपूर येथील रहिवासी यासीर अली उर्फ सैय्यद परवेज सैय्यद गणी (वय ३५ वर्षे, व्यवसाय- ड्रायव्हर) हा त्याच्या राहत्या घरी बेकायदेशीररित्या गांजा बाळगून त्याची विक्री करत असल्याचे बातमीदाराने सांगितले. या बातमीची तात्काळ पोलीस ठाण्याच्या दैनंदिनीत नोंद घेऊन वरिष्ठांना अवगत करण्यात आले. त्यानंतर एन.डी.पी.एस. कायद्यातील सर्व कायदेशीर तरतुदींचे तंतोतंत पालन करून पंचांसह, वजनमापक, छायाचित्रकार आणि पोलिसांच्या ताफ्याने संशयिताच्या घरावर अचानक छापा टाकला. (हे हि वाचा – किरकोळ वादातून चाकू हल्ला)
आरोपीच्या घरातून १६ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त
बगड खिडकी मदरशाजवळ असलेल्या आरोपीच्या घरी घेतलेल्या झाडाझडतीत पोलिसांना १६.०२५ किलोग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाबाबत कसून विचारपूस केली असता, आरोपीने सांगितले की त्याचा साला जुबेर करीम खान (रा. बगड खिडकी) आणि त्याच्या घरात वजन काटा ठेवणारा आरोपी कालू (रा. बगड खिडकी) यांनी हा गांजा त्याच्या घरी आणून ठेवला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून कॅनबिस/गांजाची हिरवी पाने, फुले, बिया आणि देठ ओलसर असलेली वनस्पती (निव्वळ वजन १५.८६० किलोग्रॅम, किंमत प्रति किलो १० हजार रुपयांप्रमाणे १,५८,६०० रुपये), एक जुना वापरता KiloMaxx कंपनीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा (किंमत १,५०० रुपये) तसेच दोन प्रवासी बॅगा व गांजाच्या पुड्या बनवण्यासाठी वापरलेले चिकटपट्टीचे रोल असा एकूण १,६०,१०० रुपयांचा ऐवज पंचांसमक्ष जप्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात कारवाई
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे यांच्या लेखी रिपोर्टवरून रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ९८०/२०२६ अन्वये कलम ८(क), २०(b)(ii)(b), २९ एन.डी.पी.एस. ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान कातकडे, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम, पोउपनि कृष्णा दराडे, सफौ प्रकाश बलकी, पोहवा जितेंद्र आकरे, हनुमान उगले, आनंद खरात, बाबा नैताम, रवि ढेंगळे, रामप्रसाद, मपोहवा मनीषा मोरे, पोअं प्रकाश मडावी, पंकज ठोंबरे, देविदास राठोड, सुरज शेडमाके, ब्युटी साखरे आणि सुरेश कोरवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






