चंद्रपूर – Chandrapur Police Quarter Dispute प्रकरणी चंद्रपूर पोलीस मुख्यालयातील पावनगड क्वार्टर परिसरात मोठा वाद झाला आहे. गाड्यांच्या पार्किंगवरून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आणि तिच्या पतीने मिळून हेड कॉन्स्टेबलच्या पत्नीला शिवीगाळ केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (हे हि वाचा – शिवीगाळी का केली म्हणून दोघांवर चाकू हल्ला)
दारूच्या नशेत असलेल्या पतीने कारची तोडफोड केली. यामुळे तक्रारदाराचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच हातात उघडा चाकू घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली.. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी आणि तिच्या पतीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chandrapur Police Quarter Dispute: नक्की काय घडले?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तुकूम येथील पोलीस मुख्यालयातील पावनगड क्वार्टर इमारतीमध्ये तक्रारदार रिना रवींद्र मडावी या आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचे पती रवींद्र मडावी हे चंद्रपूर पोलीस विभागात कार्यरत असून सध्या वरोरा पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत आहेत. मडावी दांपत्याची होंडा अमेज कार ही पावनगड इमारतीच्या खाली असलेल्या पार्किंग परिसरात नियमित उभी असते.
शनिवारी, १८ जुलै रोजी सकाळी तक्रारदाराचे पती कामानिमित्त बाहेर गेले असताना, सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या क्वार्टरच्या वरच्या मजल्यावर राहणारी आणि सध्या गोंडपिंपरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलीस कर्मचारी उज्ज्वला टेकाम ही रिना मडावी यांच्या घराच्या दरवाजावर आली. तिने मडावी यांना पार्किंगमधील कार काढण्यास सांगत तिथे स्वतःची कार पार्क करायची आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आहेत, अशी अट घातली. यावर रिना मडावी यांनी पती बाहेर गेले असून ते परत आल्यावर कार बाजूला काढतील, असे सांगून वाद नको म्हणून आपल्या पतीचा मोबाईल नंबर उज्ज्वला टेकाम हिला दिला.
मात्र, दुपारी ३.०० ते ३.३० वाजेच्या सुमारास इमारतीच्या खाली पार्किंग परिसरातून मोठमोठ्याने आरडाओरड आणि शिवीगाळीचा आवाज येऊ लागला. रिना मडावी यांनी गॅलरीतून खाली पाहिले असता उज्ज्वला टेकाम, तिचा पती शंकर कन्नाके, तिचा भाऊ व एक अनोळखी व्यक्ती तेथे उपस्थित होते. दारूच्या नशेत धुत असलेला शंकर कन्नाके हा मडावी यांच्या पतीला उद्देशून अत्यंत घाणेरड्या भाषेत आरडाओरड करत गाडी न काढल्यास फोडून टाकण्याची धमकी देत होता.
परिस्थितीचे गांभीर्य पाहून रिना मडावी लिफ्टने खाली आल्या असता, आरोपी शंकर कन्नाके याने त्यांचा रस्ता अडवला आणि लोकांमोहीत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने मडावी यांच्या पतीला रस्त्यात अडवून मारून टाकण्याची आणि तक्रारदाराला विधवा करण्याची उघड धमकी दिली.
या प्रकारानंतर आरोपी शंकर कन्नाके याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या होंडा अमेज कारवर लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि दगडाने बेछूट मारहाण करत तोडफोड केली. यामध्ये वाहनाचे सुमारे ८० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरीकडे, आरोपी महिला पोलीस उज्ज्वला टेकाम ही देखील स्वतःच्या पतीला चिथावणी देत सतत अश्लील शिवीगाळ करत होती आणि लोकांना जमवून तक्रारदाराचा अपमान करत होती. घटनेदरम्यान तिच्या भावाने व नातेवाईकाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र नशेत असलेल्या पतीने कोणाचेही ऐकले नाही.
काही वेळातच आरोपी शंकर कन्नाके हा स्वतःच्या घरात गेला आणि हातात उघडा चाकू घेऊन पुन्हा पार्किंगच्या ठिकाणी आला. हातात चाकू फिरवत तो मडावी यांच्या पतीचा शोध घेत जिवे मारण्याची भाषा करू लागला. या भयानक प्रकारामुळे घाबरलेल्या रिना मडावी यांनी तातडीने आपल्या मुलांना सोबत घेऊन स्वतःच्या क्वार्टरमध्ये पळ काढला. या संपूर्ण प्रकाराचे प्रत्यक्षदर्शी म्हणून पोलीस क्वार्टरमधील इतर रहिवासी मंगेश सायकांर, गणेश चौधरी यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही घटना पाहिली.
पती रवींद्र मडावी हे घरी परतल्यानंतर रिना मडावी यांनी घडलेला सर्व आपबिती प्रकार त्यांना सांगितला आणि त्यानंतर दांपत्याने तत्काळ रामनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. रिना मडावी यांच्या लेखी तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी शंकर कन्नाके आणि महिला पोलीस उज्ज्वला टेकाम यांच्याविरोधात विविध कलम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राजेश किसन सोनवणे यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस मुख्यालयासारख्या सुरक्षित ठिकाणी घडलेल्या या हिंसक कृत्यामुळे पोलीस वसाहतीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






