Chandrapur Air Quality Index : चंद्रपूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच महिन्यात चंद्रपूर शहर गंभीर वायुप्रदूषणाच्या समस्येला सामोरे गेले आहे. जानेवारी महिन्यातील ३१ दिवसांपैकी तब्बल ३० दिवस हवा प्रदूषित (Moderate AQI) श्रेणीत नोंदवली गेली असून केवळ एकच दिवस समाधानकारक (Satisfactory) असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, आरोग्यासाठी उत्तम मानला जाणारा Good AQI (0–50) असा एकही दिवस आढळलेला नाही. (वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार)
ही माहिती पर्यावरण व हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. त्यांच्या मते, थंडीचा वाढता प्रभाव, संथ वारे, वाढती वाहतूक, वाहनांमधून निघणारा धूर, कचरा ज्वलन आणि बायोमास बर्निंग यामुळे शहरातील धुळीकणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.
जानेवारी महिन्यातील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार –
0–50 (Good): एकही दिवस नाही
51–100 (Satisfactory): फक्त १ दिवस
101–200 (Moderate): तब्बल ३० दिवस
201–300 (Poor): एकही दिवस नाही
301–400 (Very Poor): एकही दिवस नाही
401–500 (Severe): एकही दिवस नाही
यावरून चंद्रपूरची हवा अत्यंत धोकादायक टप्प्यावर नसली, तरी सातत्याने प्रदूषित स्तरावर राहिल्याचे स्पष्ट होते.
हवा गुणवत्ता निर्देशांक ठरविताना किमान ३ ते कमाल ८ प्रदूषक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये PM10, PM2.5, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, अमोनिया आणि लीड यांचा समावेश असतो.
जानेवारी महिन्यात PM10 (धुळीकण १०) हे प्रदूषक तब्बल २९ दिवस प्रमुख घटक ठरले, तर PM2.5 फक्त १ दिवस आणि कार्बन मोनॉक्साइड १ दिवस आढळून आले. यावरून रस्त्यावरील धूळ, वाहनांमधील उत्सर्जन आणि कचरा ज्वलन हे प्रदूषण वाढण्यामागील मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
चंद्रपूर शहरात प्रदूषण वाढण्यामागे अनेक कारणे जबाबदार आहेत. थर्मल पॉवर प्लांट, विविध उद्योग, घरगुती कोळसा ज्वलन, वाहनांची वाढती संख्या, रस्त्यावरील धूळ, बांधकामे, कचरा जाळणे आणि स्थानिक औद्योगिक उपक्रम यामुळे वातावरणात प्रदूषकांचे प्रमाण वाढत आहे.
शहरात सुरू असलेली विकासकामे आणि वाढती वाहतूक यामुळे धूर व धूळ मोठ्या प्रमाणावर हवेत मिसळत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरूनही राज्यातील बहुतांश शहरांमध्ये अशीच स्थिती असल्याचे दिसून येते. Chandrapur Air Quality Index
हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. थंडी आणि संथ वाऱ्यांमुळे प्रदूषक हवेत पसरून न जाता एकाच ठिकाणी साचतात. पूर्वी आरोग्यासाठी चांगला मानला जाणारा हिवाळा, सध्या प्रदूषणामुळे धोकादायक ठरत आहे.
प्रदूषणाचा सर्वाधिक फटका श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना बसतो. दमा, ब्राँकायटिस, टीबी, हृदयविकार तसेच मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
प्रा. चोपणे यांच्या मते, प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ तात्पुरते उपाय पुरेसे ठरणार नाहीत. स्मॉग टॉवर, फॉग मशीन किंवा कृत्रिम पाऊस हे अल्पकालीन उपाय आहेत. दीर्घकालीन उपाय म्हणून –
वृक्षलागवड व हरित क्षेत्र वाढवणे
सायकल आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे
बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देणे
वाहनांची संख्या मर्यादित ठेवणे
कचरा जाळण्यावर कडक बंदी
उद्योगांनी प्रदूषण नियंत्रणाचे नियम काटेकोर पाळणे
प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवणे
या सर्व गोष्टींची अंमलबजावणी झाल्यासच चंद्रपूरमधील वाढते प्रदूषण आटोक्यात येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Comment