चंद्रपूर - खरीप हंगाम हा शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचा असतो. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यात बी-बियाणे, खते तसेच इतर कृषी निविष्ठांची कमतरता होणार नाही, याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी. शेतक-यांच्या बांधावर जावून त्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. (चंद्रपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरचं, भूमिपूजन संपन्न)
नियोजन सभागृह येथे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते.
कृषी केंद्रधारकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साठ्याच्या माहितीचा फलक दुकानाच्या दर्शनी भागावर लावावा, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, शेतकरी कर्जासाठी बँकेत गेल्यावर त्यांना बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रत्येक बँकेत असावी. याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी संबंधित बँकांना सूचना द्याव्यात. पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होतील, यासाठी कृषी विभागाने मिशन मोडवर काम करावे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे प्रस्ताव प्रलंबित ठेवू नये, त्यास तात्काळ मान्यता द्यावी.
माती परीक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय असून सर्व शेतकऱ्यांना मातीचे आरोग्य कार्ड वितरित करावे. माती परीक्षण करून कोणते पीक घ्यायचे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे तसेच ग्रामसभेमध्ये सुद्धा हा विषय ठेवावा. लिंकिंग बाबत शेतकऱ्यांवर कुठलीही जबरदस्ती करू नये. चोर बीटीचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना समजावून सांगा तसेच आपल्या जिल्ह्यात चोरबीटीची वाहतूक, साठवणूक व विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वन्यजीवांमुळे शेतीचे होणारे नुकसान, यावर तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्या, अशा सुचना त्यांनी केल्या.
आमदार सुधाकर अडबाले म्हणाले, प्रदूषणामुळे सुपीक जमीन नापिक व्हायला लागली आहे. प्रदूषित क्षेत्राचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच धान उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने आणखी प्रयत्न करावे. कार्यक्रमाचे सादरीकरण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले. संचालन चंद्रकात कोतपल्लीवार यांनी तर आभार आत्माचे संचालक अरुण कुसळकर यांनी मानले.
लिंकिंग करून कृषी निविष्ठा विक्री करू नये : खासदार प्रतिभा धानोरकर
चोर बीटीवर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथके नेमली पाहिजेत. कृषी केंद्र धारकांनी शेतकऱ्यांना लिंकिंग करून कृषी निविष्ठा विक्री करू नये. यावर्षी कमी पावसाची शक्यता असल्यामुळे कमी पावसात कसे पीक घेता येईल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
चंद्रपूर बाजार समितीमध्ये शेतकरी भवन व्हावे : आमदार किशोर जोरगेवार
खरीप हंगामात खत वाटप व्यवस्थित झाले पाहिजे. प्रदूषणामुळे कापूस काळा पडतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राच्या बाजूला असलेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना राहण्यासाठी सुसज्ज शेतकरी भवनाची निर्मिती करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
पिकांची उत्पादकता अचूक नोंदवा : आमदार देवराव भोंगळे
पिकांची उत्पादकता प्रतिहेक्टरी अचूक नोंदवावी. चना आणि कापूस प्रति हेक्टरी किमान 20 क्विंटल उत्पादकता वाढवावी. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत लॉगिन आयडी चा प्रश्न तात्काळ निकाली काढावा, जेणेकरून शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, असे आमदार देवराव भोंगळे म्हणाले.
बियाणे व खतांचे नियोजन : खरीप हंगाम 2026 साठी जिल्ह्यात एकूण बियाणे मागणी 61619 क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. रासायनिक खतांचे एप्रिल 2026 अखेरपर्यंत 1 लक्ष 80 हजार 800 मे. टन आवंटन मंजूर असून त्यापैकी 1 लक्ष 1 हजार 909 मे. टन साठा प्राप्त झाला आहे. खतांची लिंकिंग करणा-या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
Leave a Comment