Datala Gram Panchayat : चंद्रपूर - दाताळा ग्रामपंचायतीत गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला असून ग्रामसेवकावर विकासकामांतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचे गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते भारत आनंदराव रोहने यांनी केले आहेत. या प्रकरणी गेल्या १४ महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भारत रोहने यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. (चंद्रपूर महापौर, कांग्रेसने दिली मित्रपक्षांना मोठी ऑफर)
भारत रोहने यांनी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे प्रथम तक्रार दि. १३ डिसेंबर २०२४, दुसरी तक्रार दि. १९ डिसेंबर २०२४ तर तिसरी तक्रार दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल करत तात्काळ चौकशी, ग्रामसेवकाचे निलंबन व फौजदारी कारवाईची मागणी केली होती.
तक्रारीनुसार सन २०२० पासून नाली बांधकाम, साहित्य खरेदी, मजुरी देयके, ऑफलाइन निविदा प्रक्रिया, जेसीबी वापर, वॉटर एटीएम देखभाल तसेच घरपट्टी व कर आकारणी या सर्व कामांमध्ये नियम धाब्यावर बसवून शासन निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष काम न करता बिले काढून निधी लाटल्याचा आरोप करण्यात आला असून निविदा न जाहीर करता ठराविक ठेकेदारांना कामे दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
भारत रोहने यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत दि. ०७/०५/२०२५ रोजी गट विकास अधिकारी, पंचायत समिती चंद्रपूर यांना आदेश दिले होते. मात्र, अद्याप संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल सादर न झाल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
चौकशी प्रत्यक्ष सुरू न करता चौकशी अधिकारी व विस्तार अधिकारी, पंचायत समिती चंद्रपूर यांनी विविध मुद्द्यांवरील माहिती व दस्तऐवज मागविण्याबाबत दि. ०६/०६/२०२५ रोजी तक्रारदारास पत्र दिले. यावरून चौकशी अधिकारी भ्रष्ट ग्रामसेवकाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप उपोषणकर्ते भारत रोहने यांनी केला आहे. Datala Gram Panchayat
तसेच ग्रामसेवक व सरपंच यांच्याविरोधात तक्रार केल्याच्या रागातून भारत रोहने यांच्या घरालगतची नाली मुद्दाम तोडण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. नाली तोडल्यामुळे त्यातील अशुद्ध व घाणेरडे पाणी घराजवळ साचत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व प्रकाराला कंटाळून तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे भारत रोहने हे दि. ०९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ग्रामपंचायत पटांगणात संविधानिक मार्गाने आमरण उपोषणास बसले आहेत. वृत्त लिहेपर्यंत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी उपोषणकर्त्याच्या भेटीस आलेला नव्हता.
या गंभीर प्रकरणामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती व प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून दोषींवर कारवाई होते की प्रकरणावर पडदा टाकला जातो, की उपोषण दडपले जाते—हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Comment