चंद्रपूरचा चेहरा बदलणार! शक्तीपीठ ते म्हाडा कॉलनीपर्यंत मुनगंटीवारांचा नवा मास्टरप्लॅन

February 07, 2026 by Prakash Hande

Sudhir Mungantiwar Chandrapur : चंद्रपूर -चंद्रपूर शहराचा सुसज्ज आणि सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ, दाताळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. शक्तिपीठ परिसराचा सर्वांगीण विकास होऊन भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी संबंधित कामांना गती देण्याचे निर्देश म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान रस्ते, पार्किंग, सौंदर्यकरण आणि परिसर विकासाच्या विविध विकासकामांबाबतही त्यांनी सूचना करत विकासाची ठोस दिशा निश्चित केली. (त्या अपघातानंतर मुनगंटीवार झाले भावुक)

दाताळा येथील श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण, पार्किंग व्यवस्था, मंदिर परिसराचे सौंदर्यकरण तसेच गायत्री परिवाराच्या संकल्पनेनुसार बगीचा उभारण्याचे निर्देश त्यांनी नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले यांना दिले. या कामांमुळे परिसराचा विकास होऊन भाविकांना अधिक सोयी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्यात नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले, बांधकाम आणि म्हाडा विभागाचे अधिकारी, गायत्री परिवाराचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.यावेळी म्हाडाच्या १७ हेक्टर खुल्या जागेत मुलांसाठी खेळण्याचे गार्डन, ऑक्सिजन पार्क, वृद्धांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले.

चंद्रपूरचा सुसज्ज व आधुनिक विकास साधण्यासाठी आवश्यक निधी शासनस्तरावर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले. यावेळी गायत्री परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. Sudhir Mungantiwar Chandrapur

पोलिस गृहनिर्माण व प्रशिक्षण केंद्रासाठी निधी
पोलिसांसाठी गृहनिर्माण व प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक निधी येत्या मार्चपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून पाठपुरावा करण्याचेही आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना
नागपूर रोड ते देवाडा शिव हा ३० मीटर रुंदीचा व सुमारे ४.५ किलोमीटर लांबीचा रस्ता उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आ.मुनगंटीवार यांनी दिल्या.

Leave a Comment

+